घरमहाराष्ट्रआता आशिष शेलारांची सेनेला ‘ऑफर’

आता आशिष शेलारांची सेनेला ‘ऑफर’

Subscribe

नागरिकत्वाच्या बाजूने राहा; आम्ही तडजोड करतो

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास शिवसेनेने मदत केल्यास आणि महाराष्ट्रातही ते लागू केल्यास त्याबदल्यात राष्ट्रहिताच्या दृष्टीने भाजप राजकीय तडजोडीस तयार आहे, अशी खुली ऑफर आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिली आहे. भाजपच्या येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागरिकत्वाच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेतून सहभाग काढून घेतला तरी सरकार वाचवण्यासाठी आम्ही पुढे येऊ, असे सांगत त्यांनी शिवसेनेला ही ऑफर दिली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकला लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिली. मात्र, शिवसेनेने लोकसभेत समर्थनार्थ मतदान केले असले तरीही राज्यसभेत विरोध दर्शविला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावामुळे शिवसेनेने घूमजाव केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर हे विधेयक महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिकाही काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी घेतली. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या भाजप पदाधिकार्‍यांनी शिवसेनेला आता नवी ऑफर दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले शेलार?

नागरिकत्व विधेयकाची देश आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र, काँग्रेसने विधेयकाला विरोध करत भारत बचाव आंदोलन छेडले आहे. हे भारत बचाव नाही तर बांग्लादेशी, पाकिस्तानी बचाव आंदोलन आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे सरकार आहे. हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने देशहिताकडे दुर्लक्ष करू नये.

नागरिकत्व विधेयकाची देश आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र, काँग्रेसने विधेयकाला विशिवसेनेने कोणालाही न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा. आपल्या राजकीय कर्तव्यापासून पळ काढू नये. भारतात लपून बसलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना वाचवू नये. काँग्रेसच्या तीन मंत्र्यांनी नागरिकत्व विधेयक महाराष्ट्रात लागू करू नये, अशी भूमिका घेतली आहे. या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. लोकसभा आणि राज्यसभा या सर्वोच्च सभागृहाने विधेयकाला मंजुरी दिलेली असतानाही विरोध करण्याचा उर्मटपणा बरा नव्हे. या भूूमिकेस निदान शिवसेनेने तरी खतपाणी घालू नये.

- Advertisement -

एकीकडे सत्तेची ऑफर देताना दुसरीकडे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे ‘स्थगिती सरकार’ बनले आहे, अशी टीकाही त्यांनी दुसरीकडे केली. या सरकारने नागरिकत्व विधेयकाला स्थगिती देऊ नये. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करावी. त्यावरून काही पेचप्रसंग निर्माण झाल्यास सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेशी तडजोड करण्यास आम्ही तयार आहोत. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा कधीच हेतू नव्हता. घुसखोरांना घालवलेच पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेशी तडजोडीला तयार आहोत, असेही आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

ती वेळ निघून गेली संजय राऊतांचे प्रत्युत्तर

आता कोणीही कोणासाठी दरवाजे उघडू नयेत, जेव्हा दरवाजे उघडायला हवे होते, तेव्हा ते उघडण्यात आले नाहीत. आता ती वेळ निघून गेली आहे, अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. जनतेने जनादेश आम्हाला दिला, मात्र शिवसेनेने फारकत घेतली आणि मोडतोड करुन सरकार स्थापन केले. शिवसेना जे काही वागली त्याला काहीही अर्थ नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरूनच वाढला आहे.

कोणी कोणाचे फोटो वापरणे हा गुन्हा नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावे. महाराष्ट्राला आदर्श विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा आहे. अनेक दिग्गजांनी योग्यरित्या ही जबाबदारी पार पाडली. राज्यात भाजपनेच शिवसेनेचे उमेदवार पाडले, याची माहितीही आमच्याकडे उपलब्ध आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यात आम्ही जर वेगळे लढलो असतो तर शंभरी गाठली असती असा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकाला ज्या भूमिका मिळाल्या त्या निभवल्या पाहिजेत, असेही राऊत म्हणाले.

सुज्ञांस अधिक सांगणे न लगे
‘रेप इन इंडिया’ या वादग्रस्त विधानावर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी ही भाजपची मागणी राहुल गांधी यांनी फेटाळून लावली. एवढेच नाही तर माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर नसल्याचे आणखी एक वादग्रस्त विधान त्यांनी आज रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे आयोजित भारत बचाव रॅली दरम्यान केले. पण यावर आता राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुज्ञांस अधिक सांगणे न लागे, असे म्हणत राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. तसेच या बाबतीत तडजोड होणार नाही, असे विधानसुद्धा संजय राऊत यांनी ट्विटमध्ये केले आहे. ‘आम्ही पंडीत नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे’,असे राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -