आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाराज; सोनियांना दिल्लीत भेटणार

अशोक चव्हाण यांनी घेतली राज्यपालांची भेट

ashok chavan
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान, दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील या भेटीची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाबाबत अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. ते आपली नाराजी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त करणार आहेत. त्यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमवार किंवा मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. अशोक चव्हाण यांच्यासह आणखी काही काँग्रेस मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. समन्वय समितीतून नाराजी दूर होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करतील, अशीदेखील चर्चा आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत महाष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसदेखील महत्त्वाचा पक्ष आहे. मात्र, या सरकारमधून काँग्रेसला डावलले जात आहे, असे काँग्रेस मंत्र्यांचे म्हणणे आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते दिल्लीत जावून सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तिथे ते आपली खदखद काँग्रेस अध्यक्षांकडे व्यक्त करणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे. काँग्रेस नेत्यांच्या या तक्रारीवर सोनिया गांधी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे. पण, काँग्रेस नेत्यांची नाराजी महाविकास आघाडी सरकारला महागात पडू शकते.