Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट, केली 'ही' विनंती 

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट, केली ‘ही’ विनंती 

महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची भेट घ्यावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ‘मराठा आरक्षणाबाबत सोमवारी झालेल्या वकिलांच्या बैठकीबाबत आणि या प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली. महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची भेट घ्यावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबतही यावेळी चर्चा झाली,’ असे चव्हाण म्हणाले.

सोमवारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेत नवीन महाराष्ट्र सदनमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली होती. यावेळी प्रामुख्याने येत्या २५ जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या सुनावणीच्या रणनितीवर चर्चा झाली होती. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या अ‍ॅटर्नी जनरलला नोटीस दिली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बाजू मांडणे केंद्र सरकारला क्रमप्राप्त झाले आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडताना केंद्राने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा, १०२ व्या घटना दुरुस्तीचा राज्यांच्या अधिकारांवरील परिणाम आदींबाबत सकारात्मक बाजू मांडली, तर एसईबीसी आरक्षणाच्या लढ्याला मोठी मदत होऊ शकेल. महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला तर अनेक राज्यातील आरक्षणाचे प्रश्नही निकाली निघू शकतील. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घ्यावी, असा हेतू असून या भेटीकरिता शरद पवार पुढाकार घेणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -