घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या बारामतीत ३७० कलम लागू आहे का?

शरद पवारांच्या बारामतीत ३७० कलम लागू आहे का?

Subscribe

शरद पवारांच्या बारामतीत ३७० कलम लागू आहे का? तेथे जाण्यास आणि सभा घेण्यास मनाई आहे का, असे सवाल करत मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बारामतीत महाजनादेश यात्रेदरम्यान घोषणाबाजी करणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते.

भाजपाची महाजनादेश यात्रा रविवारी पुण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पक्षातील नेते मंडळी प्रवेश करीत आहे. कोणत्या जागा कोणी लढवायच्या हे पाहूनच पक्षात इनकमिंग सुरू आहे. आतापर्यंत मेगा भरती झाली. पण यापुढे मेगा भरती नसून भरती सुरू राहणार आहे. आगामी काळात पुन्हा भाजपामध्ये मेगा भरती केव्हा होणार या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

- Advertisement -

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सेनेला कार्यक्रमादरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्त्यांमध्ये युती केव्हा होणार आणि जागा वाटपाबाबत उत्साह आहे. यावर कोणीही काळजी करू नये, लवकरच युतीची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

महाजनादेश यात्रेमुळे शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फ्लेक्स बाजी करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अशा प्रकारची होर्डिंगबाजी करणे चुकीचे आहे. शहराच्या अध्यक्षांना मी याबाबत सूचना देखील दिल्या आहेत. तसेच होर्डिंग लावून कोणाला तिकीट मिळत नाही. असे होर्डिंग लावणार्‍यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल.

- Advertisement -

द्राक्षे मिळाली नाहीत की ती आंबट

द्राक्षे मिळाली नाहीत की ती आंबट असतात, अशी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आहे. उदयनराजे हे राष्ट्रवादीत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मते मागताना आनंद मिळत होता. राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा ही उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली काढावी, असा आग्रह होता.उदयनराजे पक्षात असताना त्यांना त्यांच्यातील कुठलेही दोष दिसले नाही. पक्ष सोडून गेल्यानंतर मात्र त्यांना दोष दिसायला लागले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रात जायला तयार
मला विचारणा झाल्यास मी केंद्रातील मोदी सरकारमध्ये काम करायला स्वखुशीने राजी होईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रातील मोदी सरकारमध्ये काम करायला आवडेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले. मात्र, सध्यातरी मी मुख्यमंत्री पदावर खूष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -