घरमहाराष्ट्रइच्छुकांच्या रुसव्या फुगव्याची चिंता!

इच्छुकांच्या रुसव्या फुगव्याची चिंता!

Subscribe

रायगडमध्ये युती आणि महाआघाडीत अस्वस्थता

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना सर्वच प्रमुख राजकीय पक्षांतून इच्छुकांची भली मोठी ‘यादी’ बाहेर येत आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी तयार असलेले तिकीट मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांनी तिकीट मिळाली नाही तर बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन निर्माण होणारे रुसवे-फुगवे कसे दूर करायचे, याची चिंता सर्वच पक्षांच्या नेत्यांना आतापासून सतावत आहे. रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांत युती व महाआघाडीत सारे काही आलबेल नाही. त्यामुळे इच्छुकांचे रुसवे-फुगवे उफाळून येणार यात काही शंका नाही.

लोकसभेसाठी रायगडचे दोन भाग झाले आहेत. पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व दापोली मतदारसंघाचा रायगड लोकसभा, तर कर्जत, उरण व पनवेल, पुण्यातील लोणावळ्यापासून पुढे पिंपरी-चिंचवडपर्यंतचे तीन मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. यावेळी रायगडमध्ये महाआघाडी प्रथमच व मावळमध्ये शिवसेना दुसर्‍यांदा विजयी झाली आहे. स्वाभाविक रायगडमधील ७ विधानसभा मतदारसंघात महाआघाडी व महायुती असा सामना रंगणार आहे. परंतु आघाडी किंवा युती भक्कम पायावर उभी राहण्याबद्दल साधार शंका व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

गेल्या लोकसभेला शिवसेनेच्या अनंत गीते यांच्या उमेदवारीला शिवसेनतून छुपा विरोध होता. मात्र मातोश्रीने डोळे वटारताच परिस्थिती नरमली. दरम्यानच्या काळात जिल्हा शिवसेनेत गटबाजी जोर धरू लागल्याने यावेळी विधानसभेला शिवसेनेतच आपले घोडे पुढे दामटण्याची शर्यत लागणार आहे. मात्र शेवटी निर्णय मातोश्रीवरून होत असल्याने इच्छुक तलवारी म्यान करतील. खरी गंमत आहे ती काही जागांवार युतीमध्ये भाजप व सेनेकडून दावा केला जात असल्याची. त्यात पेण, अलिबाग, उरण, कर्जतचा प्रामुख्याने समावेश आहे. या जागांवर सेनेचा हक्क असताना तेथे भाजपकडून अनुक्रमे माजी मंत्री रवी पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते, महेश बालदी, तर कर्जतमध्ये देवेंद्र साटम यांच्यासह तब्बल पाचजण इच्छुक आहेत. विशेष म्हणजे कर्जतमध्ये शिवसेनेचेही पाचजण उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

रायगड लोकसभेमधील गुहागर व दापोलीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. यावेळी गुहागरमध्ये भास्कर जाधव इच्छुक असले तरी ते महाआघाडी की महायुतीकडून लढणार हा औत्सुक्याचा भाग आहे. दापोलीत संजय कदम हे महाआघाडीचे उमेदवार असतील, मात्र शिवसेना तेथे प्रबळ असल्याने पुन्हा सूर्यकांत दळवी की आणखी कोण, हा औत्सुक्याचा भाग राहील. महाडमध्ये सेनेचे भरत गोगावले व आघाडीचे माणिक जगताप हे आमने-सामने उभे ठाकतील हे स्पष्ट आहे. श्रीवर्धनमध्ये सेनेत प्रवेश केलेल्या अवधूत तटकरे यांची उमेदवारी नक्की मानली जाते, तर भाजपही तेथे उत्सुक आहे. पेणमध्ये आघाडीकडून शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील हे उतरतील, मात्र सेना-भाजपत जागेचा तिढा होऊ शकतो.

- Advertisement -

अलिबागमध्ये आघाडीकडून शेकापचे विद्यमान आमदार पंडित पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. पण काँगे्रसचे माजी आमदार मधुकर पाटील हेही या जागेवर दावा ठोकण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सेनेची मते 40.11 व राष्ट्रवादीची 39.89, ती शेकापची 13.13 टक्के होती. २०१९ ला सेनेचा उमेदवार येथून पराभूत झाला असला तरी टक्केवारी 44.42 झाली आहे. राष्ट्रवादी (महाआघाडी) ची टक्केवारी 47.49 झाली आहे. वंचित बहुजनला 2.26 टक्के मते मिळाली. ‘नोटा’ मिळालेली 2.06 टक्के मते मात्र चिंता वाढवणारी ठरली आहेत.

इच्छुकांच्या रुसव्या फुगव्याची चिंता!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -