राजकीय मॅरेथॉन.. है किसमे दम!

Mumbai
sharad pawar
शरद पवार

राज्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक म्हणजे राजकीय मॅरेथॉन. दीर्घ काळ धावत असलेले राजकीय पक्ष या पुढील दीड-दोन महिन्यात आपल्या धावण्याचा वेग वाढवणार. त्यात जो दम ठेऊन धावणार तो विजयी होणार. साधारणत: २०१४ सालची गोष्ट असेल. चार विधानसभांच्या निवडणुकांची नांदी झाली होती. त्यावेळी भाजपने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा केली होती. त्याबरोबर मोदींनी देशव्यापी दौरे सुरू केले. एकामागोमाग एक विराट सभा घ्यायला सुरुवात केली.

गुजरातबाहेर मोदींना त्यावेळी मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे देशात मोदींच्याच नावाची चर्चा होती. मोदींना प्रसारमाध्यमेही टीआरपीसाठी चांगली प्रसिद्ध देत होती. त्याचवेळी चाणाक्ष, जाणता राजा शरद पवार यांनी केलेले एक भाष्य महत्वाचे होते. त्यांनी इतरांप्रमाणे मोदींची टवाळी केली नाही. पण कुणालाही पटणारे, असे एक विधान केलेले होते. आपण खूप निवडणूका लढवल्या, असा हवाला देत मोदी कुठे फसतील याचे भाकित पवारांनी केले होते. आज पवार किंवा अन्य कोणाला ते भाकित आठवते काय?

मॅरेथॉन शर्यतीमध्ये आधीच धावत सुटलेल्यांची पुढे दमछाक होते आणि उशिरा सुरू करणारेच शर्यत जिंकतात, असे विधान पवारांनी केलेले होते. पवारांचे ते विधान पटणारे होते. पण काळ बदलला होता. आज बहुसंख्य मॅरेथॉन स्पर्धा पाहिल्या तर जो स्पर्धक सुरुवातीपासून लिड मिळवतो तोच मॅरेथॉन जिंकतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यावेळी २०१४ च्या लोकसभेची मॅरेथॉन मोदीच जिंकले. त्याचे कारण सुरुवातीचाच दम त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. मग पवार चुकीचे म्हणाले होते काय? की पवारांना मॅरेथॉन म्हणजे काय, त्याचाच पत्ता नव्हता? पवार लोकसभा निवडणुकीबद्दल बोलले होते, की राजकारणातील शर्यतीबद्दल त्यांनी मतप्रदर्शन केले होते? राजकारणातली कारकिर्द, ही खरी मॅरेथॉन शर्यत असते.

त्यामध्ये निवडणुका हे टप्पे असतात. शर्यतीला आरंभ पहिल्या छोट्यामोठ्या निवडणुकीतून होत असते आणि पुढे पुढे अधिक वेगाने धावायची गरज असते? राज्यातील सध्याची स्थिती पाहिली तर कोण जोरात धावत आहे आणि कोण मरगळले आहेत हे स्पष्ट दिसते. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक कोण जिंकणार याचे आराखडे बांधणे शक्य आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. स्पर्धेत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. त्याला गवसणी घालून आपली कामगिरी उंचावणारा अंतिम रेषा सहजतेने ओलांडतो. आता घोडामैदान जवळ आले आहे. कोण थकलेय आणि कोण सुसाट आहे हे लवकरच कळणार आहे.