राज ठाकरें यावेळी कोणत्या चौकटीत? भाजपने व्यंगचित्रातून उडवली खिल्ली

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि त्यानंतर काही वेळातच भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे.

Mumbai
Assembly Elections 2019 : bjp post cartoon raj thackeray asking stand about mns time
'राज' मान्य खेळ; ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार

महाराष्ट्रासह देशात उत्सुकता लागलेल्या विधानसभा निवडणुकांचे आज बिगुल वाजले आणि त्यानंतर काही वेळातच भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. भाजपाने एक व्यंगचित्र काढले असून त्या व्यंगचित्रात राज ठाकरेंचा ‘सोंगटी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ‘राज’मान्य खेळ, असा मथळा या व्यंगचित्रात काढण्यात आला आहे.

काय आहे या व्यंगचित्रात

भाजपने राज ठाकरेंचे एक व्यंगचित्र काढले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे ठिक्कर हा खेळ खेळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच २००४ च्या चौकटीत शिवसेना तर २००९ च्या चौकटीत मनसे दाखवण्यात आली आहे. तर २०१९ लोकसभा निवडणुकीच्या दोन चौकटी दाखवण्यात आल्या. या चौकटीमध्ये राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या चौकटीत उभे राहिले आहेत, असे दाखवण्यात आले आहे. या चौकटींच्या पुढे २०१९ ची विधानसभा निवडणुकीची चौकट दाखवली असून त्यामध्ये प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले आहे. यावरुन यंदाच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे कोणत्या चौकटीत जाणार याचा विचार करत असल्याचे दाखवण्यात आले असून राज ठाकरेंना ‘सोंगटी’, असे देखील संबोधण्यात आले आहे. ‘आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार?’ असा प्रश्न विचारुन भाजपाने राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

राज ठाकरेंच्या या शब्दांने भरली धडकी

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरताही प्रचारात चांगलीच रंगत भरली होती. राज ठाकरेंनी दहा सभा घेऊन मोदी आणि भाजपच्या जाहीरातबाजीचे व्हिडिओ सभांमधून दाखवले होते. ‘लाव रे तो व्हिडिओ’, असे शब्द राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरावी, एवढी दहशत या शब्दांनी निर्माण केली होती. लोकांनीही राज ठाकरेंच्या या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, प्रत्यक्षात या सभांचा काहीही परिणाम झाला नाही हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत ‘अनाकलनीय’ अशी एका शब्दाची प्रतिक्रियाही दिली होती. आता विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच आघाडीसोबत राज ठाकरे जातील, असा कयास लावला जात होता. मात्र, मनसेला सोबत घ्यायचे नाही ही भूमिका काँग्रेसने घेतली असल्यामुळे मनसेला सोबत घेता आले नाही हे शरद पवार यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले होते. त्यामुळे आता निवडणूक जाहीर होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्या चौकटीत जाणार अशा संभ्रमात असल्याची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले आहे आणि त्यात राज ठाकरेंची खिल्ली उडवण्यात आली आहे.


हेही वाचा – मनसे विधानसभा निवडणूकीत ५० ते ६० जागा लढणार?