विधानसभा निवडणुकीचा अंतिम निर्णय ‘राज’ ठाकरेंचाच

यंदाची विधानसभा निवडणूक लढवायची की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय हा राज ठाकरे यांचा असणार आहे.

Mumbai
raj thackeray
राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार्‍या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अजूनही निश्चित निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या मुंबई विभाग अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक राज गडावर घेण्यात आली असली तरी मात्र, या बैठकीला राज ठाकरे उपस्थितीत नसून अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक मनसेने लढवायची की नाही? यावर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठककीपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याआधी राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी आज झालेल्या बैठकीनंतर दिली आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर

‘मनसेने निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्ही काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी आम्हाला निवडणूक लढवावी, असे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर निवडणूक लढवण्याच्या बाजूने आमचा कल आहे. आमची याआधीची चर्चाही सकारात्मक झाली असून यासंदर्भात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. राज ठाकरे ईव्हीएमबाबत साशंक आहेत. तसेच ही निवडणूक ईव्हीएमवरच घेतली जाणार आहे. दरम्यान पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही सगळेच निवडणूक लढण्याच्या बाजूने आहोत मात्र, आमचे म्हणणे ऐकून घेऊन, आमचा अहवाल पाहून राज ठाकरे काय ते ठरवतील आणि तोच अंतिम निर्णय राज ठाकरे जाहीर करतील’, असे बाळा नांदगवाकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – मनसे विधानसभा निवडणूकीत ५० ते ६० जागा लढणार?


राज ठाकरेंच्या या शब्दांने भरली होती धडकी

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरताही प्रचारात चांगलीच रंगत भरली होती. राज ठाकरेंनी दहा सभा घेऊन मोदी आणि भाजपच्या जाहीरातबाजीचे व्हिडिओ सभांमधून दाखवले होते. ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे शब्द राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरावी, एवढी दहशत या शब्दांनी निर्माण केली होती. लोकांनीही राज ठाकरेंच्या या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, प्रत्यक्षात या सभांचा काहीही परिणाम झाला नाही हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत ‘अनाकलनीय’ अशी एका शब्दाची प्रतिक्रियाही दिली होती. आता विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा –  गड-किल्ल्यांपेक्षा तुमच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या – राज ठाकरे