घरमहाराष्ट्रसत्तेचे टी-20 विधानभवनातील हिरवळीवरून

सत्तेचे टी-20 विधानभवनातील हिरवळीवरून

Subscribe

क्रिकेट आणि राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यात कधी आणि कोण कशी बाजी पलटवील हे सांगू शकत नाही, असे भाजप नेते नितीन गडकरी काही दिवसांपूर्वी म्हणाले. याचा प्रत्यय सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेकांना येतोय. क्रिकेटचे कसोटी, वनडे आणि ट्वेंटी-ट्वेंटी असे तीन प्रकार आहेत. तसेच राजकारणाचेही दोन प्रकार आहेत, एक पारंपरिक आणि दुसरे झटपट राजकारण. पहिल्या प्रकारात तुम्हाला उमेदीची अनेक वर्षे इथे घालवावी लागतात, कष्ट करावे लागतात. तर दुसर्‍या प्रकारात ‘ज्याची कॉलर वरती ती आपली पार्टी’ असे म्हणून सत्ताधार्‍यांच्या समोर सरपटावे लागते. सध्याचा राजकीय ट्रेंड पाहिला तर अनेक जण दुसर्‍या प्रकारात खेळणं पसंत करतात. कारण कमीत कमी कष्टांमध्ये आपला हेतू साध्य केला जातो. हे सांगायचं कारण इतकंच की एकतर नितीन गडकरींनी केलेली क्रिकेट आणि राजकारण याची तुलना आणि गेल्या दोन दिवसात घडलेला राजकीय नाट्यमय घडामोडींनी भरलेला नाट्यमंच आणि त्यावरची असंख्य पात्र आज पाहायला आणि अनुभवायला मिळाली विधान भवनात आणि भवनाच्या परिसरातल्या हिरवळीवर.

मागील पाच वर्षे शिवसेना-भाजप आणि रिपाईच्या महायुतीची सत्ता होती. त्या सत्तेच्या काळात देवेंद्र फडणीस यांनी केलेलं काम आणि त्यांना शिवसेनेने सत्तेसाठीच दिलेली साथ पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता मिळणे दुरापास्त होतं. पण अहंकार, हट्ट या सगळ्यांनी उभयकडच्या बाजूंना पार झपाटून टाकलं आणि सत्तेचा शकट असा काही हल्ला की विचारू नका. केंद्रातल्या सत्तेच्या पाठबळावर भाजपने अजित पवारांना आपल्या गळाला लावलं आणि रातोरात सूत्र हलवून रामप्रहरी शपथ विधी उरकून घेतला. त्यानंतर शरद पवारांनी जे जे करायलं हवं ते केलं आणि गपचूप पळालेले अजित पवार उघड्या दाराने राष्ट्रवादीत आणि त्याआधी ‘सिल्वर ओक’ मध्ये परतले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा दिला आणि क्रिकेट आणि राजकारणात कोण बाजी मारेल हे सांगू शकत नाही या गडकरींच्या विधानाची सत्यता पटली. अर्थात मंगळवारी जे घडलं त्याचं सावट हे बुधवारच्या विधिमंडळाच्या आमदारांचा शपथविधी वर स्पष्टपणे दिसत होतं. सगळेच विलक्षण तणावात होते. ठाकरे – पवार यांच्या तिसर्‍या पिढीचे सदस्य विधानसभेच्या शपथविधीचा मुहूर्त साधत होते, तर दुसरी पिढी राज्याचा प्रमुख होण्यासाठीचा ‘नॉक’ घेत होती.

- Advertisement -

म्हणजेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठीची सराव प्रक्रिया जगत होती. ठाकरे-पवारांची दुसरी पिढी कोण तर उध्दव-सुप्रिया…उद्धव राजभवनावर राज्यपाल कोश्यारी यांना भेटत होते आणि मुख्यमंत्री होण्यासाठीची प्रक्रिया समजून घेत होते, तर शरद पवारांची कन्या सुप्रिया विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर शपथविधीसाठी येणार्‍या सर्व पक्षीय आमदारांचे स्वागत करत ’अगली बार पवार सरकार’ असंच जणू सुचवत होत्या. मिनिटा-मिनिटाला बदलणार्‍या घटनांमुळे आमदारांवरचा आणि राजकीय कार्यकर्त्यांवरचा तणाव दूर करण्यासाठी बुधवारी सुप्रिया सुळे हस्तांदोलन,अलींगण आणि आपुलकीच्या चौकशांनी वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे स्वागत तर केलंच पण त्यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचेही आपुलकीने जणू काही घरंच कार्य असल्यासारखं स्वागत केलं. फडणवीस-शेलार यांनी शक्य होईल तितकं दोन दिवसात बेडकीइतकं बळ असताना बैल असल्याचा बाहू केलेला प्रयत्न किती अपयशी होता हे सगळ्यांनीच पाहिलं. आणि त्याची पराभूत छटा भाजपच्या कोअर टीमच्या चेहर्‍यावर साफ दिसत होती.

आज सकाळी आठ वाजता आमदारांच्या शपथविधीला प्रारंभ झाला, तेव्हा जी गोष्ट कसोटी क्रिकेटची तीच आजच्या शपथविधी सुरुवातीच्या आमदारांच्या कार्यक्रमाची. शपथविधीच्या कार्यक्रमालाही माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने नव्हते आणि आमदारांना ‘चिअर’ करणारे कार्यकर्तेही नव्हते. पण तासाभराने सगळा नूर बदलला. आणि मध्यान्हाच्या आधी 282 आमदारांना शपथ देण्यात आली. हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा सूर्य उगवला अर्थात हा आकाशातला सूर्य नव्हता तर शिवसेनेचा ‘आदित्योदय’ होता. आदित्य ठाकरे विधानभवनातून बाहेर आले. या नव्या हिरोला आपल्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी आणि त्यांचा बाईट मिळवण्यासाठी चॅनेलच्या मंडळींनी केलेला कल्ला इतका भयंकर होता की विचारता सोय नाही.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांच्या पुढेमागे करण्यामध्ये शिवसेनेतील काही मंडळी आपल्या शारीरिक आणि मानसिक कष्टांची कसोटी लावून घेत होते. त्याच वेळेला चॅनेलची अनेक मंडळी आपण किती ‘विशेष’ आहोत हे सांगण्याचाही प्रयत्न करत होती. विधानभवनात आदित्य यांचा पहिलाच दिवस असताना चॅनेलच्या मंडळींची जी रेटारेटी सुरू होती, ती पाहता दुसर्‍या बाजूला एखाद-दुसर्‍या कॅमेरासमोर बाईट देणारे पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यासारखे कंटेंट असणारे नेते ग्लॅमर नसल्यामुळे काहीसे निवांत होते. त्यांना माध्यमांचा गराडा नसला तरी पाच वर्षांच्या सत्तेच्या दुष्काळानंतर शिवसेनेमुळे त्यांना उघडलेली सत्तेची कवाड ही त्यांच्या चेहर्‍यावर तेज आणण्यासाठी पुरेशी होती. राजकारणात जे तेज सत्तेचं असतं क्रिकेटमध्ये तेच ग्लॅमरचं असतं…

उद्धव ठाकरे राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान होताना त्यांच्या जवळ जाऊन मंत्री कसे होता येईल याच्यासाठी तिन्ही पक्षांचे आमदार एका बाजूला लॉबिंग करताना दिसत होते, तर दुसर्‍या बाजूला चांगल्या मंत्र्यांकडे जाऊन चांगली पोस्टींग कशी पदरी पाडून घेता येईल म्हणून अधिकारीही लॉबिंग करताना दिसत होते. गेल्या महिन्याभरातला सत्तेचा जीवघेणा खेळ ज्या मंडळींनी पराकोटीच्या क्षमतेने खेळला त्यामध्ये खासदार संजय राऊत, ठाण्याचे एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि उद्धव यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या नावांची चर्चा होती. यापैकी शिंदे-आव्हाड शपथविधीसाठी उपस्थित होते. त्यांच्या भोवतीचा चाहत्यांचा आणि चॅनेल पत्रकारांचा गराडा त्यांचं विजयातलं योगदान अधोरेखित करत होतं. अजित पवारांची घरवापसी झाली असली तरी त्यांचे समर्थक समजल्या जाणार्‍या धनंजय मुंडे आणि 23 तारखेला राजभवनावर फडणवीस-पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदारांच्या मनाची घालमेल ही त्यांच्यासहित अनेकांना अस्वस्थ करणारी होती.

गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर शपथविधी होणार आहे, या शपथविधीच्या तयारीवर जातीने लक्ष ठेवण्यासाठी सुनील प्रभू, एकनाथ शिंदे हे विधानभवनातून शिवाजी पार्कमध्ये तळ ठोकण्यासाठी लगबगीने निघाले. आपल्या आमदार पदाच्या शपथविधीपेक्षा आणि विधीमंडळातील कागदोपत्री प्रक्रियेपेक्षा या नेत्यांचं मन आणि जीव हा शिवाजी पार्कवरील शपथविधी सोहळ्याच्या आयोजनामध्ये घुटमळत होता. कारण 14 वर्षे पक्षातले आणि कुटुंबातलेही विरोधक मोडीत काढून त्यांचा नेता उद्या राज्याच्या सर्वोच्च पदाच्या शपथग्रहणासाठी सज्ज होत होता. फडणवीसांकडून मारण्यात आलेल्या खराब फटक्यांची चर्चा विधानभवनाच्या हिरवळीवर आणि पावलापावलावर अनेक आमदार करत होते. त्यात मोजक्या संख्येने असलेली भाजपाची मंडळीही होती.

फडणवीस सरकारच्या काळात तोर्‍यात वावरणार्‍या मंडळींचा तोरा पार उतरला होता.आमदारांच्या निळे-काळे सफारी घालून बॉडीगार्ड बनलेल्यांच्या गराड्यात वावरत माहौल बनवून ‘मसाला-मॅच’ खेळणारे दलबदलू उघडे पडले होते. या अहंकारी मंडळींच्या पांढर्‍याफटक चेहर्‍यांकडे बघून एक गोष्ट जाणवत होती. राजकारण आणि क्रिकेटमध्ये सगळंच अनिश्चित असतं…तेव्हा गॅलरीमधून आपण इतकंच म्हणू शकतो ‘उठा’ सरकार येतंय…‘उठा’ सरकार येतंय…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -