मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न; रिपब्लिकन टिव्हीच्या ३ पत्रकारांना अटक

cm uddhav thackeray

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रायगड येथील फार्महाऊसवर विनापरवानगी शिरकाव करणाऱ्या रिपब्लिकन टिव्हीच्या ३ पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रय्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ही कारवाई केली आहे. खालापूर तालुक्यातील भिलवले भागात उद्धव ठाकरे यांचा बंगला आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हे तीन पत्रकार आले होते.

या तीघांनी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षकाकडे ‘ठाकरे फार्महाऊस’ची चौकशी केली. सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर ड्युटीवर आलेल्या सुरक्षारक्षका पाठोपाठ हे तीन पत्रकार पोहोचले आणि “माहिती असूनही खोटे का सांगितले?” असं बोलत सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला.

सुरक्षारक्षकांनी गाडीचा नंबर तातडीने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. मुंबई एटीएसने तातडीची पावले उचलत नाकाबंदी केली. या तीन पत्रकारांना नवी मुंबई टोल नाक्यावर ताब्यात घेतलं. काल रात्रीपासून या तिघा जणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे.