घरमहाराष्ट्रअवसरे धरण वाहू लागले,पण शेतीसाठी पाणी मिळेना !

अवसरे धरण वाहू लागले,पण शेतीसाठी पाणी मिळेना !

Subscribe

कर्जत तालुक्यातील अवसरे येथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेले लघु पाटबंधारे विभागाचे धरण चांगला पाऊस झाल्याने तुडुंब भरून त्यातील अतिरिक्त पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर वाहू लागले आहे. मात्र धरणाचे पाणी गेली चार वर्षे शेतीसाठी सोडले जात नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना उन्हाळी पिके घेत येत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. धरणाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

पाटबंधारे विभागाने अवसरे, बिरदोले आणि वरई गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करून अवसरेे धरण साकारले. त्या भागातील सात गावांतील 300 हेक्टर जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचे पाणी धरणाची अनेक वर्षे दुरुस्ती केली गेली नसल्याने शेतीला कमी पडते. त्यामुळे अवसरे भागातील शेतकरी वगळता कोदिवले, बिरडोळे, वरई, मानवली, निकोप आणि मोहाली भागातील शेतकरी भातशेती उन्हाळ्यात करीत नाहीत. दरवर्षी शेतकरी धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी करीत असतात, पण पाटबंधारे विभागाला शेतकर्‍यांच्या मागणीकडे पहायला वेळ नाही. गेल्या चार पाच वर्षांत किरकोळ प्रमाणात शेतकरी उन्हाळाच्या भातशेती करीत आहेत.

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या 30 हेक्टर जमिनीवर अवसरे धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या जलाशयात पाण्याखाली गेलेल्या जमिनीचे केवळ भू भाडे असून, काही शेतकर्‍यांच्या जमिनी या सांडवा, मातीचा बांध आणि कालवे यांच्यासाठी वापरल्या आहेत. त्या जमिनी आता शेतकरी आपल्याला वापरायला मिळाव्यात म्हणून मागणी करीत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागावर या भागातील शेतकरी नाराज आहेत. मात्र धरण पाण्याने तुडुंब भरले असल्याने शेतकरी खूश झाला आहे. जलाशयात पाणीसाठा 64 दशलक्ष घनमीटर होत असून, मृत साठा वगळता ते सर्व पाणी हे शेतीसाठी देण्याचे नियोजन असते. मात्र या भागात एका खासगी पाइपलाइनचे काम करण्यासाठी शेतीसाठी पाणी देणे बंद झाले ते आजतगायात दिले गेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना उन्हाळयात शेती करता येत नाही.

या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जायची. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सहज शक्य व्हायचे. परंतु पाणी सोडले जात नसल्याने शेती करणे बंद झाले आहे. शेतकर्‍यांच्या रोजगाराचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यात शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी अवसरे, वरई, बिरदोले, कोदिवले, निकोप, मोहिली येथील शेतकरी करू लागले आहेत.

- Advertisement -

शेतकर्‍यांची मागणी असेल तर आम्ही शेतीसाठी पाणी सोडू शकतो. मात्र धरणातून दरवेळी कमी प्रमाणात पाणी सोडले जाते. पण भात शेती केली जाणार असेल तर मात्र शेतीच्या आवश्यकतेनुसार ते सोडले जाईल.
-भरत काटले, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -