अवनीचे बछडेही नरभक्षकच होणार – शूटर

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर आता तिच्या दोघा बछड्यांचा शोध सुरू झाला आहे. मात्र, हे बछडेही नरभक्षकच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai

३ नोव्हेंबरला शनिवारी यवतमाळच्या जंगलामध्ये वनविभागाने नरभक्षक वाघिणीला गोळी घातल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. वाघिणीला मारायचं नव्हतं असा एक सूर सध्या समाजातल्या विविध स्तरातून येत आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी तर या प्रकरणावरून थेट राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाच राजीनामा मागितला आहे. शिवसेना आणि मनसेसोबत विरोधकांनी या प्रकरणावरून भाजपला घेरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अवनी वाघिणीला गोळी घालणाऱ्या शूटर्सने आणखीन एका खुलासा केला आहे. या खुलाशामुळे सध्या बेपत्ता असलेल्या वाघिणीच्या २ बछड्यांचं काय होणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

शिकारीवेळी बछडेही वाघिणीसोबतच!

अवनी वाघिणीने जेव्हा यवतमाळ जंगलाच्या आसपासच्या गावांमध्ये गावकऱ्यांवर हल्ले केले, तेव्हा तिचे दोन्ही बछडेही तिच्यासोबतच होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिचे बछडेही नरभक्षकच होण्याची शक्यता आहे असा दावा या वाघिणीवर गोळी घालणारे शूटर शआफत अली यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.


हेही वाचा – ‘म्हणून गोळी झाडली’, अवनी वाघीण प्रकरणाची तिसरी बाजू!


म्हणून बछडेही होऊ शकतात नरभक्षक!

वाघिणीचे बछडे हे तिच्या आईकडूनच शिकार कशी करायची हे शिकत असतात. सध्या हे बछडे १० ते ११ महिन्यांचे आहेत. नेमकी याच वयात त्यांची शिकारीची मानसिकता घडत असते. अवनी वाघिणीने गावकऱ्यांवर हल्ले केले तेव्हा हे दोन्ही बछडे तिच्यासोबत होते. तसेच, काही ठिकाणी या बछड्यांनी माणसांना खाल्ल्याचे देखील पुरावे सापडले आहेत, अशी माहिती शआफत अली यांनी दिली आहे. दरम्यान, अवनी मेल्यामुळे गेल्या ४ ते ५ दिवसांपासून हे बछडे उपाशी असून त्यांना अजून काही दिवस काही खायला मिळाले नाही, तर उपाशी पोटी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो, अशी माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी दिली आहे.

वाघिणीच्या मृत्यूवर राजकारण

या मुद्द्यावरून सध्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात वाद सुरू आहे. दोघांनीही एकमेकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, शिवसेना आणि मनसेने भाजप सरकार आणि मुनगंटीवारांवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी नुकताच कृष्णकुंजवर पत्रकारांशी संवाद साधताना ‘भाजपच्या नेत्यांना माज आला आहे‘, अशी शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here