‘म्हणून गोळी झाडली’, अवनी वाघीण प्रकरणाची तिसरी बाजू!

दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिला जाणारा विषय म्हणजे यवतमाळच्या जंगलात मारली गेलेली अवनी वाघीण. यावर आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अवनीवर गोळी झाडणाऱ्या वनविभागाच्या शूटर्सनी त्यांची बाजू मांडली आहे.

Yawatmal

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात एका वाघिणीच्या मृत्यूवरून मोठा गदारोळ सुरू आहे. यवतमाळजवळच्या जंगलात वनविभाग अधिकाऱ्यांनी अवनी नावाच्या वाघिणीला गोळी घालून ठार केलं. मात्र, अवनीला मारणं आवश्यक होतं की नव्हतं? यावर आता चर्चा झडू लागली आहे. एवढंच काय, तर हा मुद्दा थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. याच प्रकरणात सुधीर मुनगंटीवार आणि मनेका गांधी यांच्यानंतर तिसरी बाजू म्हणजेच प्रत्यक्ष अवनीवर गोळी झाडणाऱ्या वनविभागाच्या शूटरनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. हा वाद सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच या शिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

वादावर पडदा पडणार का?

शूटर शआफत अली खान यांचा मुलगा नवाब अजगर अलीने अवनीवर गोळी झाडली होती. त्याने आता त्याची बाजू स्पष्ट केली आहे. नक्की त्यावेळी काय घडलं होतं आणि अवनीवर गोळी का झाडावी लागली? याची संपूर्ण परिस्थितीच अजगरअलीने उलगडून दाखवली आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘…ती अंगावर झेपावली आणि आम्ही गोळी झाडली!’

अजगरअलीने दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या २ वर्षांमध्ये अवनीला ५ वेळा ट्रँक्वेलाईज केलं गेलं होतं. पण तरीदेखील आसपासच्या ग्रामस्थांवर तिचे हल्ले कमी होत नव्हते. त्या दिवशी देखील आम्ही तोच प्रयत्न करत होतो. आम्ही तिच्यावर ट्रँक्वेलाईज डार्टने निशाणा साधला. पण त्यामुळे शांत न होता ती जास्तच चवताळली आणि आमच्या दिशेने झेपावली. त्यामुळे स्वसंरक्षणााठी शेवटी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली.’ ‘गेल्या २ वर्षांपासून अवनीला जेरबंद करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते’, असंदेखील अजगर अलीने एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.


हेही वाचा – गावकऱ्यांनी ट्रॅक्टर चढवून वाघिणीला केलं ठार


अवनीच्या मृत्यूवर राजकीय भांडाभांड

अवनी मृत्यू प्रकरणावरून गेल्या दोन दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. एकीकडे मनेका गांधींनी या प्रकरणासाठी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना जबाबदार धरत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही भाजपवर परखड टीका केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवनीच्या मृत्यूवर राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे की काय? असाच प्रश्न राज्यातल्या जनतेला पडला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here