Corona ची भीती सोडा, ९७ टक्के करोनाबाधित ठणठणीत बरे होतात! – डॉ. रुपेश पाटकर

Mumbai
coronavirus image
प्रातिनिधिक छायाचित्र

जगभरात करोना विषाणूने थैमान घातले असताना आता भारतात देखील करोना बाधित रुग्णांची संख्या काही शेकड्यात गेली आहे. त्यामुळेच भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी या करोनाला घाबरण्याची गरज नसल्याचे डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितले आहे. पाटकर हे उत्तर गोवा सार्वजनिक रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक देखील आहेत. करोनाला खरंच घाबरण्याची गरज आहे का? यावर आपलं महानगरचे कार्यकारी संपादक संजय परब यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी करोना बाधितांचा मृत्यूदर अवघा दोन ते तीन टक्के असल्याचे पाटकर यांनी सांगितले आहे.


प्रश्न – करोनाविषयी समज असण्यापेक्षा गैरसमज मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत, यावर काय सांगाल?

उत्तर – करोनाची संसर्ग क्षमता प्रचंड असली तरी करोनामुळे दगावण्याची शक्यता ३ टक्के आहे. म्हणजे ९७ टक्के करोनाबाधित ठणठणीत बरे होऊ शकतात. २० टक्के लोकांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाही. बहुतांशी लोकांमध्ये खोकला वैगरे व्हायरल इन्फेक्शनसारखी लक्षणे दिसत नाही आणि ती आपोआप ठीक होतात. मात्र ज्या व्यक्ती दगावतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. वार्धक्य किंवा इतर आजार झालेल्या व्यक्ती यांचा यात समावेश असतो. या आजाराचा मुख्य प्रॉब्लेम आहे त्याचे जलद पसरणे आणि हे पसरणे खोकल्यातून जे ड्रॉपलेट (आपण तुषार म्हणू) हवेत फेकले जातात ते दुसऱ्याच्या शरीरात गेल्यामुळे होतात. समजा एखादा व्यक्तीमध्ये हे जंतू असतील तर ते त्याच्यापासून सुमारे दोन आठवड्यापर्यंत दुसऱ्याला संसर्ग करू शकतात. म्हणून जो करोनाबाधित आहे त्याला इतरांपासून दोन आठवडे दूर ठेवायला हवे.

प्रश्न – समाजाने करोनाचा सामना कसा करायला हवा?

उत्तर – खरेतर मानवजातीने याआधी करोनासारख्या भयानक महामारीचा सामना केला आहे. प्लेगच्या साथीत समशानात सतत चिता जळत असल्याची वर्णने वाचायला मिळतात. पण, त्यावेळी जनतेने त्याला निर्भयपणे तोंड दिले. सावित्रीबाई फुले यांनी जाणीवपूर्वक प्लेगग्रस्तांची सेवा करण्याकगी जबाबदारी घेऊन बलिदान केले. कदाचित त्या काळात प्रसार माध्यमे ( त्या काळात वर्तमानपत्रे होती) लोकांच्या समस्या निर्माण करत नव्हती. व्हाटसअप, फेसबूक आदी आंतरराष्ट्रीय कीर्तीची विद्यापीठे नव्हती. म्हणून माणसे विवेक वापरत होती. विचार करत होती. बिथरून जात नव्हती. अर्थात आजही हे चित्र आहे, फक्त मेंढरांसारखी काळपवृत्ती बाजूला ठेवून उघड्या डोळ्याने बघायला हवे. तुमच्या लक्षात येईल को सार्वजनिक हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, प्रशासन स्टाफ, इतकेच नव्हे तर वॉर्ड बॉय, आया, चतुर्थश्रेणी कर्मचारी निर्भयपणे सेवा देत आहेत. ते करोना च्या भीतीमुळे सुट्टीवर गेलेले नाहीत. मी ज्या उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात काम करतो तेथे संशयित करोनाग्रस्त रुग्णांना विलग ठेवण्यात आलेले आहे, पण त्यांची आम्ही नियमित तपासणी करतो, त्यांना औषधपाणी देतो. त्यांच्या उपचारात भेदभाव करत नाही. विशेष म्हणजे आम्ही स्वतः रुग्णांची काळजी घेत असताना आमच्या कपड्यांवरून करोनाचे जंतू आमच्या कुटुंबापर्यंत घेऊन जात असू, पण आम्ही घाबरलेलो नाही. करोना विरोधातील लढाई तशी मोठी नाही, तरीही ती लढाई आहे आणि यात सैनिकांच्या शहादतीची शक्यता आहे. या लढाईत बिनीचे सैनिक होण्याचे भाग्य लाभलेल्या जगभरात आरोग्य क्षेत्रात अहोरात्र काम करणाऱ्या करोडो लोकांपैकी मी एक आहे, याचा मला अभिमान आहे.

प्रश्न – करोना साथीच्या पार्श्वभूमीवर काही अनुभव सांगाल?

उत्तर – माझ्या ओपीडीत गेल्या आठवड्यात एक युरोपियन बाई आली होती. ती हेरॉईनचे व्यसनग्रस्त होती आणि त्यावर ती गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या ओपीडीत उपचार घेत होती. माझ्या खुर्चीसमोर बसून आपल्या आजाराविषयी बोलण्याऐवजी ती मला सांगते, डॉक्टर आर यू नॉट विअरिंग ए मास्क? तिच्या प्रश्नामुळे मी मास्क लावायला विसरलो, हे लक्षात आले. मी सॉरी म्हणत मास्क लावला आणि तिला पुढची औषधे आणि उपचार सांगत घरी पाठवले. यावेळी माझ्या मनात विचार आला. पेशंटची गर्दी आणि त्यात घाई गडबडीने उरकलेले जेवण यात मी मास्क लावायला विसरलो. पण त्या बाईचे काय? हेरॉईनचे जीवघेणे व्यसन लावताना या युरोपियन बाईला कधी भीती वाटली नाही, पण ज्या आजारात फक्त ३ टक्के लोक दगावण्याची शक्यता असते त्याला ही बाई का घाबरत आहे. त्या आधी एक मद्यप्राश जडलेला रुग्ण माझ्याकडे आला. माझा सहकारी त्याच्यावर उपचार करत होता आणि त्याने दिलेल्या औषधांचा काही साईड इफेक्ट होणार नाही ना, याची काळजी घेण्यासाठी मला विचारत होता. मी म्हणालो, दारूची बाटली घेताना लिकर दुकानाच्या मालकाला कधी विचारलेस का? याचे काही परिणाम होतात का म्हणून. तो समजला आणि पुढे काही न बोलता निघून गेला. खूप काही अनुभव आहेत. तूर्तास थोडा विचार करा. करोनाला सामोरे जाताना तुम्ही आम्ही सर्वजण काळजी घेऊ. पण, न घाबरता!


 

Dr. Rupesh Patkar
डॉ. रुपेश पाटकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here