सरसकट अँटिबायोटिक्स घेणाऱ्यांनो सावधान! होऊ शकतो दुर्मिळ आणि गंभीर आजार

जगभर गेले ७-८ महिने कोरोना थैमान घालत आहे. कोरोनाचा धसका सर्वांनीच घेतला आहे. थोडं जरी बरं वाटलं नाही तरी लोकं डॉक्टरांना न विचारता औषधं घेतात. अशा पद्धतीने औषधं घेणं चांगलच महागात पडू शकतं. कारण एका ६५ वर्षीय व्यक्तीला देखील सरकट गोळ्या घेणं महागात पडलं आहे. या व्यक्तीने अँटिबायोटिक्स (Antibiotics) घेतली. यामुळे या व्यक्तीला मल्टी ड्रग रेसिस्टंट बॅक्टेरिया (Multi Drug Resistant Bacteria – अनेक औषधांना दाद न देणारा विषाणू) संसर्ग झाला आहे. हा संसर्ग त्या व्यक्तीच्या जीवावर बेतलं असतं, शिवाय, हा संसर्ग पसरला असता.

मिरजमध्ये राहणारे ६५ वर्षांचे मेहबूब जमादार यांना सरसकट अँटिबायोटिक्स घेतल्यामुळे त्यांना दुर्मिळ संसर्ग झाला आहे. मेहबूब जमादार यांना नीट चालता येत नव्हतं तसंच श्वास घेताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली. तपासणीत Methicillin-Resistant Staphylococcus Aureus (MRSA) संसर्ग झाल्याचं निदान झालं. सरसकट अँटिबायोटिक्सचं सेवन किंवा हा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या संसर्गाची लागण होते, असं डॉक्टरांनी सांगितलं.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या क्रिटीकल केअर मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे यांनी रुग्णाबद्दल माहिती दिली. डॉ. प्राची साठे यांनी सांगितलं की, “रुग्ण रुग्णालयात आला त्यावेळी त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. चालणं देखील अशक्य होतं, रुग्णाचे अवयव कार्यरत नव्हते, नीट श्वास घेता येत नव्हता, त्याचं हिमोग्लोबिन ३ इतकं कमी झालं होतं. शिवाय त्याचा रक्तदाब कमी होता आणि त्याच्या रक्त सेप्टिक होतं. सेप्टीमिया ज्याला ब्लड पॉयसनिंग म्हणून पण ओळखलं जातं. ज्यावेळी शरीरात बॅक्टेरियाचा संसर्ग असतो त्यावेळी सेप्टीमिया होतो.”

आम्हाला हा संसर्ग कोणत्या विषामूमुळे झाला हे शोधायचं होतं. यासाठी आम्ही जेव्हा तपासणी केली, तेव्हा आम्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हा विषाणू होता MRSA, ज्यामुळे हा दुर्मिळ संसर्ग झाला. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात MRSA संसर्गाची प्रकरणं कमी आहेत. मात्र, या प्रकरणात MRSAचा संसर्ग समुदायातून आल्याचं दिसून आलं आहे. याचं कारण म्हणजे अँटीबायोटिक्सचा सरसकट वापर, असं डॉ. साठे यांनी सांगितलं. दरम्यान, रुग्णाला संसर्गापासून मुक्त करण्यासाठी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. रुग्णाच्या पाठीत पू जमा झाला होता. तो काढून टाकम्यात आला आहे. MRSA संसर्गाचे विषाणू नाकामध्ये देखील होते. आता रुग्ण संसर्गापासून मुक्त आहे.


हेही वाचा – Hathras Rape Case: तुमच्या मुलीसोबत असं झालं असतं तर..; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना खडसावले