घरट्रेंडिंगभंडारा दुर्घटना पहिलीच घटना आहे का? याआधी किती वेळा रुग्णालयांना आग लागलीय?

भंडारा दुर्घटना पहिलीच घटना आहे का? याआधी किती वेळा रुग्णालयांना आग लागलीय?

Subscribe

सगळे गाढ झोपेत असताना काळानं डाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतलं. ज्या घरांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट होणार होता. त्या कुटुंबाचं सुख काळाला पाहवलं गेलं नाही आणि त्याला सुस्थावलेल्या सरकारी व्यवस्थेचीही मदत झाली. शॉर्ट सर्किटच निमित्त ठरलं आणि डोळे उघडून छाती भरून मोकळा श्वास घेण्याआधीच दहा कोवळ्या जिवांनी जगाचा निरोप घेतला. भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर मातांच्या आक्रोशानं मन हेलावून गेलं. आपल्या चिमुकल्यांसाठी टाहो फोडणाऱ्या मातांना बघून सगळ्यांचे डोळे भरून आले. भंडारामध्ये घडलेल्या घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हळहळला आहे. मात्र, एखाद्या रुग्णालयाला आग लागून मृत्यू झालेली ही पहिली घटना नाही आहे. याआधी देखील रुग्णालयांना आगी लागल्या आहेत.

भारतात २००६ पासून २०१२ या ७ वर्षांच्या काळात २० हून अधिक वेळा रुग्णालयाला आग लागली. यामध्येशेकडो लोकांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेतून सरकार, प्रशासनांनी धडा घेतलेला नाही. ९ डिसेंबर २०११ साली कोलकात्यातील अत्यंत आधुनिक सोयी-सुविधा असलेल्या एएमआरआय रुग्णालयाच्या सातमजली इमारतीला आग लागली. या आगीत ९३ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सर्व रुग्णालये आणि नर्सिंग होममधील ‘फायर सेफ्टी’ यंत्रणा चोख ठेवण्यासाठी १३ कलमी नियमावली फेब्रुवारी २०१२ मध्ये जारी केली. मात्र, यानंतर देखील रुग्णालयांमध्ये आगी लागली. अनेकांचा मृत्यू झाला. १७ ऑक्टोबर २०१६ ला भूवनेश्वर येथील सम रुग्णालयाला आग लागली. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता. आयसीयूमध्ये ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने आग लागली होती. या दुर्घटनेत २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेची चौकशी करण्यात आली. यामध्ये चारहून अधिक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. १७ डिसेंबर २०१८ ला अंधेरीमधील कामगार रुग्णालयाला आग लागली होती. या आगीमध्ये दोन महिन्याच्या चिमुकलीसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून १५७ जण जखमी झाले. मृत्यू पावलेल्या पीडित कुटुंबियांना १० लाख रुपयांची तर गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. या घटनेच्या चौकशीचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाच्या काळात कोविड रुग्णालयांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ६ ऑगस्ट २०२० मध्ये अहमदाबादमधील कोविड हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली होती. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला होता. या आठ रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. ही घटना अहमदाबादच्या नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये घडली. या हॉस्पिटलमध्ये ५० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. याशिवाय, ६ डिसेंबर २०२० ला कोविड रुग्णालयाला आग लागली होती. उल्हासनगर येथील मॅक्सलाइफ या कोविड रुग्णालयातील आयसीयू कक्षात ६ डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आल्याने मोठे संकट टळले आणि रुग्ण बचावले.ही केवळ उदाहरणं आहेत. अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेवर काम गरजेचं आहे. मात्र, हा विषय कधीच चर्चीला जात नाही. दरम्यान, आजच्या भंडारा घटनेनं तरी प्रशासनाला जाग येईल आणि भविष्यात असं काही घडणार नाही, याची काळजी घेतील एवढीच आशा बाळगू शकतो.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -