घरमहाराष्ट्रठाकरेंका देवी भराडी पावली, चाकरमान्यांच्या गर्दीचा रेकॉर्ड!

ठाकरेंका देवी भराडी पावली, चाकरमान्यांच्या गर्दीचा रेकॉर्ड!

Subscribe

पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या समोर मालवणमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत अनामत रक्कम गमावलेल्या शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख परशुराम (जीजी) उपरकर सध्या कोकणात मनसेचे नेते आहेत. नारायण राणे भाजपचे खासदार आहेत. आणि १५ वर्षांपूर्वी राजकीय वावटळीत सापडलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सोमवारी ते आंगणेवाडीच्या जत्रेला येऊन आई भराडीदेवी समोर दंडवत घालणार आहेत.

मसुरे येथील आंगणे कुटुंबियांची आई भराडी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी श्रध्दा आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या राजकीय वाटचालीकडे पाहिले तर त्याची प्रचिती येते. नारायण राणेंना शिवसेनेने २००५ मध्ये पक्षाबाहेर काढल्यावर ते काँग्रेसमध्ये जाऊन महसूल मंत्री झाले. राणेंवर अन्याय झाला अशी कोकणी माणसांची समजूत झाली आणि उध्दव ठाकरे यांनी १२ दिवस तळ ठोकून आणि दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचाराला येऊनही शिवसेनेचे उमेदवार परशुराम उपरकर यांनी फक्त पराभवच नाही तर आपली अनामत रक्कमही गमावली. संपूर्ण शिवसेना एकवटून मालवण विधानसभा लढली तरी जिंकलो नाही, म्हणून २१ नोव्हेंबर २००५ रोजी उद्धव ठाकरे यांना अक्षरश: मान खाली घालावी लागली. पण सातत्याने चिवटपणे प्रयत्न करणार्‍या आणि आपला शब्द प्रमाण मानणार्‍या नेत्यांना- कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी १५ वर्षांनंतर राजकीय आश्चर्याने मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री’ हे खरे करून दाखवले. त्यामुळेच सोमवारी होणार्‍या आंगणेवाडीच्या जत्रेला उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून असणारी उपस्थिती कोकणी माणसांबरोबरच चाकरमानी मुंबईकरांसाठीही विशेष बाब ठरली आहे. गेली दोन वर्षे पक्षप्रमुख म्हणून भराडी देवीच्या दर्शनाला येणारे उद्धव ठाकरे यंदा राज्याचे प्रमुख म्हणून सिंधुदुर्गात येत आहेत. निवडणुकीच्या काळात संवेदनक्षम असणारा राज्यातला हा सगळ्यात छोटा जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच्या वेळीही संवेदनक्षम झालेला आहे. मात्र पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी सुरक्षा व्यवस्थेची आकडेवारी न देता सुरक्षा ‘तैनात’ असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी मुख्यमंत्र्यांच्या आगमनापासून पुन्हा मुंबईत परते पर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा चोख असल्याचे म्हटले आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. चार वाजता देवी आई भराडीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओरोस येथील जिल्हा मुख्यालयात प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेणार आहेत. त्यामध्ये पर्यटन, शिक्षण, आरोग्य, फलोद्यान, शेतकर्‍यांचे प्रश्न यांसारख्या गोष्टींवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच चिपी येथील विमानतळाबाबत मुख्यमंत्री दोन दिवसीय मुक्कामात काय घोषणा करतात याकडे सिंधुदुर्ग वासियांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटणपासूनच पोस्टर युद्ध रंगू लागले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे यांच्या पोस्टरची संख्या गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कैक पटीने वाढलेली आहे. काँग्रेसच्या होर्डिंग्जचीही संख्या मात्र निवडणुकीच्या यशासारख्या वेळेसारखीच आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातल्या कार्यक्रमांकडे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक हे जातीने लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

सोमवारच्या जत्रेआधी आलेल्या शनिवार-रविवार हे सुट्टीचे दिवस आणि मंगळवारची रजा टाकून बुधवारी आलेली शिवजयंतीची सुट्टी यामुळे चाकरमान्यांचा विकेंड हा काहीसा घसघशीत झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अगदी छोट्या-मोठ्या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये चाकरमान्यांनी आणि देवीच्या भक्तांनी एकच गर्दी केली आहे. मासळीचा दुष्काळ असतानाही चढ्या भावाने मिळणारी मासळी खरेदी करून हॉटेल चालकांनी चाकरमान्यांची बडदास्त ठेवल्यामुळे खिशाला चाट पडून येईल. मत्स्यप्रेमी माशांचा फडशा पडताना कुडाळ, कणकवली, मालवण आणि वेंगुर्ला या परिसरात दिसून येत आहेत. गेली दोन वर्षे या देवीच्या दर्शनाला आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या घवघवीत राजकीय यशाची जोरदार चर्चा तळकोकणात शिवसैनिक आणि देवीचे भक्तगणही जोरदारपणे करत आहेत.

त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात मुंबईतील व्यावसायिक, राजकीय कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यामुळे प्रसिद्धीला आलेल्या भराडीदेवीच्या या जत्रेत यंदा भक्तांची विक्रमी गर्दी होईल, असा विश्वास आयोजक असलेल्या आंगणे कुटुंबीयांना वाटत आहे. तर दुसर्‍या बाजूला मंदीच्या गर्तेत अडकलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना ही जत्रा उभारी देईल, असा विश्वासही काही मिठाई विक्रेत्यांनी तसेच या जत्रेच्या परिसरात आपले स्टॉल लावणार्‍या स्टॉलधारकांनाही वाटत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देवीच्या दर्शनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत नेमकी काय घोषणा करतात आणि कोकणी माणसाला आपल्या घवघवीत राजकीय यशाचे काय ‘रिटर्न गिफ्ट’ देतात याकडे कोकणवासीयांच्या आणि राजकीय वर्तुळाच्याही नजरा लागलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -