घरमहाराष्ट्रभीमा-कोरेगावचा तपास राज्याकडेच ?

भीमा-कोरेगावचा तपास राज्याकडेच ?

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट

भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. भीमा-कोरेगावचा नाही, असे सांगतानाच कोरेगाव-भीमात दलित बांधवांवर अत्याचार झाला असून हा तपास केंद्राकडे कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली. सिंधुदुर्ग येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. त्यात एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणावर चर्चा झाली. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे एल्गार परिषद प्रकरणावरून राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआरसी, सीएए आणि एमपीए हे तिन्ही विषयही वेगवेगळे असल्याचे सांगत त्यावर भाष्य करून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नसून हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. तसेच सिंधुदुर्गासाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजना ही नवीन योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. या योजनेतून हॉस्पिटल, पूर, पर्यटन, नळपाणी योजना, घरबांधणी, दुष्काळ आणि डिझेलचा परतावा आदी कामे केली जाणार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -