घरमहाराष्ट्रमुंबई, ठाण्यासह राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव!

मुंबई, ठाण्यासह राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव!

Subscribe

हाय अलर्ट घोषित करण्याची गरज - राजेश टोपे

राज्याच्या वेशीपर्यंत आलेले बर्ड फ्लूच्या संकटाने आता राज्यात प्रवेश केला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षी, कोंबड्यांचा बळी गेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले असतानाच हाय अलर्ट जाहीर करण्याची गरज व्यक्त केली आहे.

वाढदिवसानिमित्ताने जालन्यात आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यू दर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता ‘बर्ड फ्लू’बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात हाय अलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू करायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गावाच्या एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जेसीबीच्या मदतीने खड्डा खणून कोंबड्या पुरण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असतानाच राज्यातील इतर जिल्ह्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे समोर आले आहे.

मुंबईत पोपट, कावळे मृत्युमुखी
मुंबई, ठाण्यात कावळे व पोपट बर्ड फ्लूने मरण पावले आहेत. कोंबड्यांच्या बाबतीत खबरदारी घेणे तुलनेने सोपे असले तरी कावळे व पोपटांचा संचार कसा रोखणार, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी मांडलेले मत अत्यंत महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

शेकडो मधमाश्यांचाही मृत्यू?

बर्ड फ्लूमुळे केवळ कोंबड्या, पोपट आणि कावळ्यांवरच संकट ओढवलेले नाही तर इतरही पक्ष्यांवर त्याचे संकट घोंघावताना दिसत आहे. नांदेडमध्ये अचानक शेकडो मधमाश्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बर्ड फ्लूमुळेच या मधमाश्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यात ही बातमी पसरल्याने नागरिक घाबरून गेले आहेत.

नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात शंभर कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक घाबरून गेले आहेत. जंगलातील मधमाशा शहरात मृत्यूमुखी पडल्याने या मधमाश्यांनाही बर्ड फ्लूची लागण झाली होती की काय? असा प्रश्न केला जात आहे. शेकडो मधमाशा मृत्यूमुखी पडल्याचे आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांना त्याची माहिती देण्यात आली. या विभागाची टीम घटनास्थळी येणार असून पुढील कार्यवाही करणार आहे. दरम्यान, चिंचोर्डीतील तीन पोल्ट्री फार्म व्यावसायिकांच्या शंभर कोंबड्या दगावल्या आहेत. या कोंबड्यांना दफन करण्यात आले असून त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली आहे.

राज्यातील परभणीसह मुंबई, ठाणे, रत्नागिरीतील दापोली आणि बीडमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड आणि परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. भोपाळच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरीतील दापोली आणि मुंबईतील चेंबूरमधील कावळ्यांचा आणि ठाण्यातील पोपटांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचेही प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले असून राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -