Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र बर्ड फ्लूचा धोका माणसांना किती? अशी आहेत लक्षणे

बर्ड फ्लूचा धोका माणसांना किती? अशी आहेत लक्षणे

घाबरू नका, ही खबरदारी घ्या

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना नंतर बर्ड फ्लूच्या साथीने डोक वर केले आहे. देशात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा अचानक मृत्यू होत आहे. अनेक ठिकाणी मृत पक्ष्यांचा खच पडलेला आढळत आहे. राज्यातही बर्ड फ्लूमुळे कोंबड्या, कावळे, बगळे, बदकांचा मृत्यू झाला आहे. यातील काही पक्ष्यांचे नमूने बर्ड फ्लू पॉझिटीव्ह आढळले आहेत. मोठ्या प्रमाणात पक्ष्यांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे माणसांमध्येही धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक बर्ड फ्लूच्या संसर्गाविषयी तर्कवितर्क लढवत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरच बर्ड फ्लूची लागण माणसांना होऊ शकते का? संसर्ग झाल्यास त्याची लक्षणे कोणती? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांना होतो का?

बर्ड फ्लू हा सामन्यता पक्ष्यांना होणारा संसर्गजन्य आजार आहे. बर्ड फ्लू आजार एका पक्ष्यापासून दुसऱ्या पक्ष्याला होतो. बर्ड फ्लू H5N1 संसर्गजन्य आजार आहे. तो हवेमार्फतही पसरतो. प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा आजार पसरतो असे तज्ञांनी सांगितले आहे. या आजाराला एव्हियन एनफ्लूएन्झा असेही म्हणतात.

- Advertisement -

बर्ड फ्लू हा संसर्गजन्य अजार माणसांनाही होऊ शकतो का? असा प्रश्न तज्ञांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की, बर्ड फ्लू हा संसर्गजन्य आजार असून याचे मुख्य नैसर्गिक घर पाणपक्षी आहेत. हा विषाणू बदक आणि पणपक्ष्यांच्या शरीरात आढळतो. पक्ष्याच्या आतड्याला या विषाणूचा प्रादुर्भाव होतो. बर्ड फ्लूचा संसर्ग पाणपक्ष्यांपासून कोंबड्या किंवा डुक्कर यांना होतो. यानंतर कोंबड्या किंवा डुक्कर यांच्याकडून हा संसर्ग माणसांकडे येतो. जगभरात आतापर्यंत सातशे माणसांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळले आहे.

महाराष्ट्रात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे अनेक बगळे, कोंबड्या आणि कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी असे म्हटले आहे की, बर्ड फ्लू संसर्गाच्या एकूण आठ प्रजाती आहेत. यातील H5N1 या प्रजातीच्या बर्ड फ्लूचा माणसांना अधिक धोका असतो. तर H5N8 या प्रजातीच्या बर्ड फ्लूचा माणसांना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. देशात बर्ड फ्लूमुळे माणसांना संसर्ग झाला असल्याचे अजूनही आढळले नाही.

- Advertisement -

परंतु कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लूच्या विषाणूची तुलना केल्यास कोरोना व्हायरस माणसांमध्ये अधिक वेगाने पसरतो. तर बर्ड फ्लूची लागण माणसांमध्ये होणे दुर्मिळ आहे. पण कोरोनाच्या तुलनेत बर्ड फ्लूचा मृत्यू दर अधिक आहे. त्यामुळे बर्ड फ्लूने मृत्यू होण्याचा दर हा ६० टक्के आहे.

अशी आहेत बर्ड फ्लूची लक्षणे

माणसांमध्ये इतर फ्लूची लक्षणे ही सर्दी, खोकला, आणि ताप अल्यास आढळतात. परंतु बर्ड फ्लूची लक्षणे दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बर्ड फ्लू हा विषाणू मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. यामुळे न्युमोनिया किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होण्याची शक्यता असते. माणसांना लागण झाल्यास ताप, सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया अशी लक्षणे आढळू शकतात.

बर्ड फ्लूची लागण माणसांना झाल्यास त्याच्या लक्षणांबाबत डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, सर्दी, खोकला, ताप ही प्राथमिक लक्षणं आहेत. परंतु न्यूमोनिया हे सुद्धा बर्ड फ्लूचे लक्षण आहे. पण भारतात बर्ड फ्लूचा संसर्ग माणसाला झाल्याचे निदर्शनास आलेलं नाही. आतापर्यंत देशात अनेक राज्यांत विविध पक्ष्यांना बर्ड फ्लूचू लागण झाल्याचे आढळले आहे.

घाबरू नका, ही खबरदारी घ्या

पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच त्यांच्या विष्ठेच्या संपर्कापासून दूर राहा. पक्षी, कोंबड्या यांचे पिजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते. अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक राहिलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखाद्या मृत पक्ष्याला हाताने स्पर्श करु नये. जिल्हा तसंच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा. पक्ष्यांना स्पर्श केल्यास आपले हात स्वच्छ करा. पूर्ण शिजलेल्या मांसाचे सेवन करा.

यो गोष्टी प्रामुख्याने टाळा

कच्चे मांस आणि अंडी खाऊ नका. तसेच अर्धवट शिजलेले मांस, चिकन अंडी खाणे टाळा. आजारी दिसणाऱ्या आणि निपचित पडलेल्या पक्ष्यांना स्पर्श करु नका. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मास एकत्र ठेवू नका.

- Advertisement -