दिव्यांनी उजळला राजगुरुंचा जन्मवाडा

Mumbai
Rajgurunagar

वार्ताहर:- दीपावलीनिमित्त आपल्या घरापासून ते शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी विविध रंगांच्या प्रकाशात, पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. त्याच उत्साहात दीपावलीनिमित्त क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मवाड्यावर राजगुरुनगर शहरातील तरुणांनी एकत्र येऊन जाणीव ग्रुप, आम्ही राजगुरुनगरकर यांच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरुवाडा दीपमय केला. आपल्या गावातील एक तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा देऊन हसत हसत फासावर गेले. त्याच हुतात्म्याच्या जन्मभूमीत दीपावलीच्यानिमित्त पाडव्याच्या मुहूर्तावर संपूर्ण राजगुरुवाडा पणत्या लावून लखलखीत करण्यात आला होता. देशाच्या नकाशाची तीन रंगात रांगोळी काढून दिव्यांनी सजवण्यात आली होती.

गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर जाणीव ग्रुपच्या माध्यमातून राजगुरुवाड्यावर होणार्‍या दीपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत गावागावातील तसेच राजगुरुनगर शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दीपोत्सवात आम्ही राजगुरुनगरकर हा ग्रुपही सहभागी झाला होता. क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंच्या जन्म वाड्याच्या प्रवेशद्वारापासून ते जन्मखोली आणि समोरील गार्डन ध्वजस्तंभ या सर्व परिसरात दिवे लावण्यात आले होते.

पवित्र अशा भीमानदीच्या तिरावर असणार्‍या या क्रांतीकारकाच्या वाड्याचे दीपोत्सवामुळे रुप पालटले. डोळे दिपवून टाकणारा हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, आपल्या क्रांतीकारकांच्या शौर्याचे कौतुक राजगुरुकरांमध्ये दिवसेंदिवस वाढत असताना त्यात तरुणाईंचा मोठा सहभाग नोंदविला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here