घरमहाराष्ट्रभाजपवर फोन टॅपिंगचे आरोप

भाजपवर फोन टॅपिंगचे आरोप

Subscribe

गृहविभागाकडून चौकशी सुरू

भाजप सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आले होते. तसेच काही नेत्यांवर पाळत ठेवली जात होती, असा आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्याच्या गृहविभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप सरकारच्या काळात आपला फोन टॅप होत असल्याचा आरोप केला होता. त्यांची ‘रि’ मग शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ओढली. माझा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने दिली होती. मी म्हणालो होतो, भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर स्वागतच आहे.

- Advertisement -

मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं संभाषण, असे ट्विट संजय राऊत यांनी केले. त्यानंतर फोन टॅपिंगवरून आरोप सुरू झाले. त्याचे थेट कनेक्शन भीमा-कोरेगावप्रकरणाशी जोडण्यात आले.

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फोन टॅपिंगबद्दल थेट भाजपवर आरोप केले. फोन टॅपिंग ही विकृती आहे. ही विकृती का केली याची चौकशी झाली पाहिजे. भीमा कोरेगाव हे षड्यंत्र आहे. महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये भांडण लावण्याचा भाजपचा हा कट आहे. दलित समर्थाकांना बदनाम करायचे आणि आंबेडकरी चळवळ संपवायची हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी सुरू होत आहे म्हणून मी आनंदी आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकवण्याची गरज काय आहे. तुमचे आणि माझे राजकीय मतभेद आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, टॅपिंगचा आरोप भीमा-कोरेगावबद्दल होतोय. हे प्रकरण पुणे ग्रामीण पोलिसांकडे होते. त्यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेकडेच होते. हवंतर त्यांना विचारू शकता केवळ आरोप करण्यात अर्थ नाही. असे कोणतेही टॅपिंग झाले नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -