घरमहाराष्ट्रभाजपने सोडला सत्ता स्थापनेचा दावा

भाजपने सोडला सत्ता स्थापनेचा दावा

Subscribe

राज्यपालांना भेटून फडणवीसांचा नकार , शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी शुभेच्छा

राज्यात सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतीय जनता पक्षाला दिले होते. मात्र रविवारी भाजपने सत्ता स्थापन करायचे नाही, असा निर्णय घेतला असून तो राज्यपालांना कळवला देखील आहे. आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. भाजप सरकार स्थापन करू न शकल्यामुळे आता राज्यपाल दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण देऊ शकतात.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. सोमवार पर्यंत आमदारांच्या संख्येसह सरकार स्थापन करण्याबाबत लेखी कळवण्याचे निर्देश राज्यपालांनी भाजपला दिले होते.

- Advertisement -

त्यामुळे सरकार स्थापन करण्याबाबत भाजपच्या नेत्यांच्या कोअर समितीची बैठक रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली. या या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. मात्र भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे ठरले. संध्याकाळी पुन्हा सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

दुपारी पुन्हा वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांच्या कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव खास दिल्लीहून आले होते. तसेच बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीत फारसा खल झालाच नाही. ही बैठक अवघ्या अर्ध्या तासात पार पडली. त्यानंतर ही नेते मंडळी राज्यपालांना भेटायला राजभवनावर केली. राजभवनावर त्यांनी राज्यपालांना भाजपच्या स्थितीची कल्पना दिल्यानंतर तेथेच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले नाहीत.

- Advertisement -

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीश महाजन पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही सरकार स्थापन करणार नाही. भाजप-शिवसेना महायुती म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो होतो. मतदारांनीही महायुतीलाच कौल दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला नव्याने सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. मात्र एकत्र लढूनही शिवसेना आमच्यासोबत सत्ता स्थापन्यास उत्सुक नाही. शिवसेनेला आमच्यासोबत यायचे नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. जनादेश असूनही शिवसेनेने सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यांनी जनादेशाचा आदर केला. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, असे राज्यापालांना सांगितल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला आहे. आता त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन करायचे आहे. त्यासाठी आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

कोअर समितीच्या बैठकीत काय झाले
मुख्यमंत्र्यांच्या ’वर्षा’ निवासस्थानी रविवारी संध्याकाळी झालेल्या भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत भाजपचे केंद्रातील निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादवही उपस्थित होते. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजप आणि शहा हे खोटारडे असल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते. त्यामुळेच शिवसेनेसोबत न जाण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच -संजय राऊत
भाजपने सत्ता स्थापनेचा दावा सोडल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली. शनिवारी संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केले जाईल. भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं भाजपकडून सांगण्यात येत होते. आम्ही त्यांच्या या वक्तव्याचं स्वागतही केले. आता त्यांनी सरकार बनविणार नाही म्हणून सांगितले. मग आता ते त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा हट्ट कसा पुरवणार? शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा करार पाळायचा नाही, स्वत:ही सरकार स्थापन करायचे नाही, अशी भूमिका घेऊन चालणार नाही, असे राऊत म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळीच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -