भाजपनं पुण्यातून दिली मेधा कुलकर्णींऐवजी संग्राम देशमुखांना उमेदवारी!

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षाने देशमुख यांना पसंती दिली आहे. येत्या १ डिसेंबरला होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने सोमवारी दिल्लीहून चार उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार अनिल सोले यांना डावलून संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद पदवीधरमधून शिरीष बोराळकर तर अमरावती शिक्षकमधून नितीन रामदास धांडे यांना उमेदवारी मिळाली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तथापि औरंगाबाद आणि पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी तर नागपूर पदवीधरची जागा काँग्रेस लढण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही १२ नोव्हेंबर आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, ५ नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात नोटिफिकेशन काढण्यात येणार असून १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल. १३ नोव्हेंबरला अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल. १ डिसेंबरला सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानासाठीची वेळ ठेवण्यात आली आहे. परिपत्रक निघाल्यानंतर ताबडतोब या मतदारसंघांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यासोबतच कोरोनासंदर्भातल्या नियमांचं देखील पालन करण्याचं बंधन या निवडणुकांमध्ये असणार आहे. त्यामध्ये मास्क घालणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन अशा महत्त्वाच्या नियमांचा समावेश आहे.