घरमहाराष्ट्रसत्ताधारी हे 'राष्ट्रीय आपत्ती', विरोधकांनी एकत्र येण्याची गरज - शरद पवार

सत्ताधारी हे ‘राष्ट्रीय आपत्ती’, विरोधकांनी एकत्र येण्याची गरज – शरद पवार

Subscribe

भाजप सरकार हेच राष्ट्रीय आपत्ती आहे, असे समजून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माकपने आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेत सांगितले.

वर्तमान सत्ताधारी हे राष्ट्रीय आपत्ती असल्याचे समजून सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या मंचावर मांडले. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. आज शेती अर्थव्यवस्था अडचणीत आहे. आत्महत्या होत आहेत, शेती उत्पादन घटलेले आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना याबद्दल आस्था नसून केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत हे सरकार म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

सत्ताधाऱ्यांना नमवायची ताकद आमच्या मनगटात

आज अर्थव्यवस्था अडचणीत आहे. एवढेच नाही तर काळ्या मातीशी संबंधित असणारा घटक अडचणीत आहे. त्यामुळे आपण एकसंघ राहिलो तर परिस्थिती बदलेल, असे सांगत सत्ताधाऱ्यांना नमवायची ताकद आमच्या मनगटात असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र येऊ असे आवाहन शरद पवार यांनी केले.

- Advertisement -

दुष्काळग्रस्त मुंबईत येतायत

आज मुंबईमध्ये झोपडपट्टी वाढत आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये दुष्काळी भागातील लोक सर्वाधिक आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हे सरकार योग्य पाऊले उचलत नाही. तसेच राज्याला दुष्काळ काही नवीन नाही. पण दुष्काळ असताना आघाडी सरकारच्या काळात मार्ग काढले गेले. मात्र आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना दुष्काळाची जराही आस्था नाही, असे सांगत त्यांनी सरकारच्या दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर टीका केली.

किसान सभेत ‘चलो दिल्ली, घेरो संसद’चा नारा

राज्याचे प्रश्न सोडून चालले राम मंदिर बांधायला

सध्या राज्यात दुष्काळ आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे राम मंदिराची… काही जण तर थेट राम मंदिर बांधायला चालले आहेत, असा टोला देखील शरद पवार यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. तसेच राम मंदिराचा मुद्दा काढून हे वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत. इतर प्रश्नांवरील लक्ष हटवण्यासाठी मंदिराचा मुद्दा काढला जातोय, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच या सरकारने नोटबंदी काळ्या पैशासाठी केली खरी पण ज्यांचा काळा पैसा होता त्यांना संरक्षण देण्याचे काम देखील या सरकारने केले. तसेच नोटबंदीनंतर आर्थिक संकट उभे करण्याचे काम देखील याच सरकारने केल्याचा आरोप पवारांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -