भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार – किरीट सोमय्या

ठाकरे सरकार भूखंडाचे श्रीखंड करणारे सरकार असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

bjp leader kirit somaiya accuses cm uddhav thackeray of dahisar Scam
किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबावर केलेल्या गंभीर आरोपानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत त्यांना वॉर्निंग दिली. यावर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत. शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. तसेच त्यांनी ‘३ हजार कोटीचा दहिसर भूखंड जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला असून आमच्याकडे त्याचे पुरावे असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. आमच्याकडे असलेले पुरावे खोटे असल्यास आम्हाला अटक करण्यात यावी’, असे देखील ते पुढे म्हणाले. त्याचप्रमाणे किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकरांविरोधात जनहित याचिका दाखल केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार भूखंडाचे श्रीखंड करणारे सरकार असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक कुटुंबासोबत ठाकरे सरकारने जमीन व्यवहार केल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले होते. ‘संजय राऊतांना ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,’ असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

‘ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. हिंमत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावं. ही भाषा, हे संस्कार त्यांचे आहेत. मला त्यांच्या भाषेत, संस्कारात पडायचं नाही,’ असं किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना म्हटलं आहे.  ‘मी आणखी नऊ सातबारा उतारे सादर करत आहेत. परवा एक सातबारा दिला तर लोक मला येऊन माहिती देतात, अधिकारी देत नाहीत. ३० जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झाले आहेत त्यापैकी ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत आहेत,’ असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

‘उद्धव ठाकरेंनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिले’, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी यावेळी तीन घोटाळ्यांची माहिती देत त्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु करणार असेही सांगितलं. याच्यासंबंधी संजय राऊत किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यामध्ये हिंमत असेल तर बोलावं’, असं आव्हानही यावेळी त्यांनी दिलं. ‘ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबरला आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार आहे. यासंबंधी मुंबई हायकोर्टात दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार आहे’, अशी माहिती यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली.

भुंकणे हे त्यांचे काम आहे

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केल्याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत म्हणाल्या की, ‘ते विरोधक आहेत. आरोप करणे त्यांचे कामच आहे. ते असेच भुंकणार. त्यांनी जे आरोप केले आहेत. ते सिद्ध करुन दाखवावे’, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांना केले आहे.


हेही वाचा – हातात कागद घेऊन गिधाडासारखा फडफडतोय; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप