शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?; नारायण राणेंचा सेनेवर हल्लाबोल

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आमदार राम कदम यांनी जनआक्रोष यात्रा काढली होती. ती यात्रा रोखल्यानंतर राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची सुटका घेतल्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी राम कदम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेने हिंदूत्व सोडले आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा घणाघात नारायण राणे यांनी केला. ठाकरे सरकारची साधूसंताना न्याय देण्याची इच्छा नाही आहे, असे नारायण राणे म्हणाले.

राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असे म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत. पदासाठी हवे ते करणारे उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना म्हणजे हिंदुत्व विचार आणि समीकरण नाही असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे.

राम कदम यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा – नारायण राणे

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी कदम यांना ताब्यात घेऊन रॅली काढण्यास मज्जाव केल्याने भाजप नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे खार पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी करत राम कदम यांची सुटका केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. कोरोना काळात अशा प्रकारचे आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी राम कदम यांना केली होती. त्यामुळे कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, असे सांगतानाच पालघर प्रकरणी राज्य सरकारने पाहिजे तशी चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे, असे राणे म्हणाले.