घरमहाराष्ट्रभाजपचे आमदार अनिल गोटे यांचा भाजपच्याच सभेत राडा!

भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा भाजपच्याच सभेत राडा!

Subscribe

भाजपने आमदार अनिल गोटे यांना डावलून धुळे पालिका निवडणुकीचे सर्वाधिकार गिरीश महाजन यांना दिल्यामुळे, त्यांनी हा राडा केल्याचे समजते आहे.

धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवल्यामुळे नाराज झालेले भाजपचे आमदार अनिल गोटे, यांनी धुळ्यात भाजपचीच सभा उधळून लावली. भाजपने आमदार गोटे यांना डावलून धुळे पालिका निवडणुकीचे सर्वाधिकार गिरीश महाजन यांना दिल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार गोटे यांनी भाजपने आयोजित केलेला मेळावा उधळून लावला. यावेळी भर मंचावरच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी धुळ्यातील जे. बी. रोडवर भाजपचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. महापालिका निवडणुकींपासून दूर ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या गोटे यांनी थेट मंचावर जात रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्याकडून माईक हिसकावून घेत, सभेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे महाजन आणि दानवे यांचे समर्थक आणि आमदार गोटे यांच्यात बाचाबाची झाल्याचंही बोललं जात आहे.

घटना सविस्तर…

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या सभेचे, आमदार गोटे यांना निमंत्रण नव्हते. अनिल गोटे हे धुळ्यातील भाजपचेच आमदार असूनही त्यांना या कार्यक्रमातून डावलण्यात आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरली बॅनरवर त्यांचे नाव किंवा फोटोही छापण्यात आला नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या गोटे एकाएकी कार्यक्रमात दाखल झाले आणि थेट व्यासपीठावर जात माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रावसाहेब दानवे आपल्या भाषणाला सुरुवात करणात होते. कार्यक्रमस्थळी जाताच गोटे यांनी बॅनरवर माझा फोटो का नाही? मला कार्यक्रमाचं निमंत्रण का नाही असा थेट सवाल दानवे यांना विचारला. मात्र, दानवे यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे गोटे यांनी स्टेजवर जात दानवेंकडून माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोटे यांचे समर्थक स्टेजवर आले आणि गोटे यांना बोलायची संधी द्या, अशी ओरड त्यांनी सुरु केली. यामुळे गोटे समर्थक आणि दानवे तसंच महाजन यांच्या समर्थकांमध्ये रेटारेटी सुरु झाली. कार्यकर्त्यांच्या आपापसातील बाचाबाचीमुळे स्टेजवरील वातावरण अचानक तापले. अखेर पोलीस आणि कार्यकर्त्यांनी गोटे आणि त्यांच्या समर्थकांना यांना स्टेजवरुन खाली आणले. त्यानंतर पक्षातील विरोधकांनी आमदार गोटे यांना त्याठिकाणाहून हुसकावून लावले.


वाचा: माणसे मेलीच पाहिजेत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -