‘घरी बसून कंटाळा आला की मुख्यमंत्री कॅमेरासमोर येतात’ भाजप नेत्याची खोचक टीका

CM Uddhav Thackeray FB Live
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच दिवसानंतर आज फेसबुकवर लाईव्ह येत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवून प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची चौकशी केली जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या लाईव्ह संवादानंतर भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. “घरी बसून वैताग आला की थोडा चेंज, थोडा विरंगुळा म्हणून मुख्यमंत्री ‘कॅमेरा’ समोर येत असावेत. कारण त्यांच्या भाषणात मरण यातना भोगणाऱ्या मराठी माणसासाठी दिलासा कमी आणि खुलासे जास्त असतात.” या शब्दात आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असतात, अशी टीका सातत्याने केली जात आहे. या टीकेला ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले होते. “तुम्ही जिथे जाऊ शकलेला नाहीत, तिथे मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाऊन आलो आहे.” असे उत्तर ठाकरे यांनी दिले होते. यावर देखील भातखळकर यांनी आक्षेप घेत टीका केली. “घरी बसून मुख्यमंत्री एकमेव धोरण राबवतायत… माझं कुटुंब माझी जबाबदारी… बाकी खबरदारी तुमची आणि जबाबदारीही तुमची…”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच भातखळकर यांनी संजय राऊत यांना देखील लक्ष्य केले आहे. “करोनाच्या थैमानात दाखवलेला ढिम्मपणा, बेफिकिरी, महिलेविरुद्ध दाखवलेली सूड बुद्धी वृद्ध नौदल अधिकाऱ्याला केलेली मारहाण आणि निलाजरे समर्थन ही पापे केल्यानंतर बदनामी करायला दुसरे कुणी कशाला हवे? आपले प्रवक्ते त्यासाठी एकटे पुरेसे आहेत.” संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची बदनामी होत असल्याचे भातखळकर यांनी सूचित केले आहे.

मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्राला नाहक बदनाम कुणीही करत नाही, ठाकरे सरकारचा चेहरा मात्र काळा ठिक्कर झाला आहे, तोही तुमच्या स्वतःच्या कर्माने. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. बरेच महिने घरी बसून तसा गैरसमज झाला असेल तर तो घरबसल्याच दूर करा.