‘जनआक्रोश’ आंदोलनापूर्वीच राम कदम पोलिसांच्या ताब्यात

bjp mla ram kadam detained by mumbai police
'जनआक्रोश' आंदोलनापूर्वीच राम कदम पोलिसांच्या ताब्यात

पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘जनआक्रोश’ आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. पण या जनआक्रोश आंदोलनापूर्वी राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान राम कदम यांच्यासोबत कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजप आमदार राम कदम कार्यकर्त्यांसोबत निवासस्थानापासून ते पालघरच्या दिशेने जात हे आंदोलन करणार होते. पण राम कदम घराबाहेर येताचा त्यांच्यावर कारवाई करत त्यांनाच ताब्यात घेतले. यावेळी राम कदम प्रसारमाध्यमांशी बोलले की, ‘हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून हे दुर्दैवी आहे.’

पालघर हत्याकांड प्रकरणाला २११ दिवस होऊनही अजूनही याबाबत कोणतीही कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात येत होते. राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता आपल्या निवासस्थापासून ते पालघरमधील हत्याकांड घटनास्थळापर्यंत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. पालघर हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे.

दरम्यान आंदोलनच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून राम कदम यांच्या निवासस्थानबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे पोलिसांचा देखील मोठ्याप्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. या आंदोलनामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी राम कदम यांच्यावर कारवाई केली.