परळीत भाजप, मनसे कार्यकर्ते भिडले

Mumbai

बीडमधील परळीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मनसे आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच राडा झाला. पन्नगेश्वर साखर कारखान्याकडून ऊसतोड मजुरांचे ‘एफआरपी’चे बिल थकल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. कारखान्याच्या संचालिका पंकजा मुंडे यांच्या परळीतील ‘यशश्री’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची हाक मनसेने दिली होती.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंच्या घराकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. पंकजा मुंडेंच्या बंगल्याकडे जात असताना भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले.परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी मध्यस्थी होऊन वाद मिटवला आणि आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांना अटक केली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र नवी मुंबईत आयोजित भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेसोबत भाजपची युती होण्याची शक्यताही धूसर झाल्याचं दिसत आहे.