घरमहाराष्ट्रनवीन मतदारांवर भाजपची नजर, नवीन मतदारांसाठी राज्यभर मेळावे!

नवीन मतदारांवर भाजपची नजर, नवीन मतदारांसाठी राज्यभर मेळावे!

Subscribe

नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप घेणार मेळावे!

विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होतील. त्यामुळेच आता सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यत कसे पोहोचता येईल? याची आखणी आता सर्वच पक्ष करू लागले आहेत. मात्र, यामध्ये भाजप एक पाऊल पुढे असून, भाजपने २८८ मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघात नव्याने नोंद झालेल्या मतदारांची यादी तयार केली आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी प्रत्येक मतदारसंघामध्ये नवीन ८ ते १० हजार मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता या नव्या मतदारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व मेळाव्यांची जबाबदारी भाजपच्या युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेली असून, २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे मेळावे प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत.

म्हणून मेळाव्यांचे आयोजन

भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले असून, त्यासाठी प्रत्येक मतदरापर्यत पोहोचण्याची आवश्यकता आहे. तसेच नवीन मतदारांपर्यत मेळाव्याच्या माध्यमातून पोहोचता आले आणि त्यांना सरकारी योजनांची माहिती दिली तर हे नवे मतदार भाजपकडे वळण्याची शक्यता असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. २१ ते ३० सप्टेंबरपर्यत चालणाऱ्या या नव मतदरांच्या मेळाव्यात सरकारने पाच वर्षांत केलेली कामे, सरकारी नवीन योजना, यासोबतच पुढील पाच वर्षांचे टार्गेट याची माहिती या नव्या मतदारांना देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एवढंच नाही तर शिवसेना-भाजप युती तुटली, तर ही नवी मते आपल्या पदरात पडावीत यासाठी ही तरतूद असल्याचे एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.

- Advertisement -

मुंबईत युवा मोर्चाच्या पदाधिकारी बैठक

नवे मतदार जोडण्याचा कार्यक्रम २१ ते ३० सप्टेंबर या काळात होणार असल्याने त्या अगोदर मुंबईत प्रदेश कार्यालयात भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राज्यभरातील भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी येणार असून, या पदाधिकाऱ्यांना भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, तसेच संघटन मंत्री विजयराव पुराणिक मार्गदर्शन करणार आहेत. युवा मोर्चाच्या बैठकीमध्ये येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना काही माहिती देण्यात आली असून, त्यानुसार बैठकीला तयारीत यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तुम्ही असलेल्या मतदारसंघात काय स्थिती आहे? तुम्ही किती जणांना भाजपसोबत जोडले? यासारखे अनेक प्रश्न युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -