घरताज्या घडामोडीसत्ता जाताच भाजप कार्यलयात शुकशुकाट; कार्यकर्ते आणि नेतेही फिरकेनात

सत्ता जाताच भाजप कार्यलयात शुकशुकाट; कार्यकर्ते आणि नेतेही फिरकेनात

Subscribe

मागील पाच वर्षात राज्यात सत्तेवर असताना भाजपचे मुंबईतील प्रदेश कार्यालय म्हणजे सत्ता केंद्र बनले होते. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात त्यावेळी सतत कार्यकर्त्यांची वर्दळ, नेत्यांच्या पत्रकार परिषदा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, चहा कॉफी आणि जेवणावळी असे चित्र पहायला मिळायचे. मात्र सध्या याच कार्यालयाकडे पाहीले तर हे गजबजलेले कार्यालय सध्या ओसाड पडल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जोश दाखवण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांनी गर्दी केली होती. सत्ता गेल्यानंतर भाजपला बळ देण्यासाठी कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत आले तरी प्रदेश कार्यालय ओसच होते.

नेत्यांच्या पत्रकार परिषदाही झाल्या कमी

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विरोधात बसल्यानंतर भाजप नेते पत्रकार परिषदा घेऊन किंवा आंदोलने करून सरकारला धारेवर धरतील असे वाटत होते. मात्र फक्त किरीट सोमय्या वगळता एकही नेता सध्या भाजप कार्यालयात फिरकताना दिसत नाही. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुणे किंवा कोल्हापूरमध्ये जास्त असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचे छत्रपतींच्या वशंजाबद्दलचे वक्तव्य आल्यानंतर नारायण राणेंनी तेवढी एकदा आणि पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर अशा दिग्गज नेत्यांची आणि मंत्रीमंडळातील सदस्याच्या जोर बैठका सत्तेच्या काळात सुरु असायच्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पोस्टर्स, झेंडे आणि यात्रेचे नियोजन करण्यात नेते व्यस्त होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात आणि १०५ जागांवर उमेदवार निवडून येताच प्रदेश कार्यालयात एकच जल्लोश झाला होता. राज्यात सत्ता आलीच अशा थाटात नेते आणि कार्यकर्ते वावरत होते.

मीडिया सेलमध्येही पत्रकारांचा सतत राबता होता. मात्र आता भाजप कार्यालयात नेतेच येत नसल्याने आणि आले तरी नेते माध्यमांशी फारसे बोलत नसल्याने पत्रकारही फारसे कार्यालयात फिरकत नाहीत. विशेष बाब म्हणजे राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार अशा थाटात नेते आणि पदाधिकारी वावरत होते. पण शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून भाजपच्या नेत्यांना जबरदस्त धक्का दिला. पण हा धक्का अजूनही भाजपच्या नेत्यांना पचवता आलेला नाही. सत्ता जाताच भाजपच्या प्रदेश कार्यालयाला ओहोटी लागली. कार्यकर्ते गायब झाले आणि टेचात वावरणारे भाजपचे नेतेही परागंद झाले. सत्ता गेल्यापासून भाजपचे दिग्गज नेते आता प्रदेश कार्यालयाकडे फिरकेनासे झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -