फडणवीसांना टरबुज्या अण मला चंपा म्हणता ते चालतं का? चंद्रकांत पाटील भडकले

Chandrakant Patil

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील देखील स्पष्टीकरणासाठी मैदानात उतरले. मी
केलेले वक्तव्य हे ओबीसी आरक्षणासंदर्भात होते. शरद पवारांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र राष्ट्रवादीचे नेते मला चंपा म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात, ते चालतं का? असा सवाल आता चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. शरद पवारांवर बोलण्याइतकी आपली किंमत आहे का? असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना मनोरुग्ण संबोधले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिले.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी बोलत नाहीत. पण त्यांना माझ्यावर बोलायला वेळ कसा मिळाला? या सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे. शाळांच्या बाबतीत काही ठोस निर्णय होत नाही. ज्यांचे विचार एक नाहीत, असे लोक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्रात असे पहिल्यांदाच घडत असावे. आम्ही काही बोललो तर लगेच त्यांची पेड ट्रोल टीम आम्हाला ट्रोल करते. पण आम्ही ट्रोलला घाबरत नाहीत, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.