घरमहाराष्ट्रभाजपने माझा वापर केला; खासदार संजय काकडेंचा आरोप

भाजपने माझा वापर केला; खासदार संजय काकडेंचा आरोप

Subscribe

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वी ‘भाजपने माझा वापर केला’, असा आरोप केला होता. आता त्यानंतर पुण्यातील भाजपचे खासदार संजय काकडे यांनी देखील याच वाक्याचा पुर्नउच्चार करत भाजपवर शरसंधान साधले आहे. आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळेल का? याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर काकडे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला भावासारखे आहेत, मात्र त्यांनीच जर मला लाथ घातली. तर आम्ही एका घरात कसे राहणार? मला दुसरे घर शोधण्याशिवाय पर्याय नाही.”

विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या भेटीनंतर काकडे एका वृत्तवाहिनीवर बोलताना म्हणाले की, “पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि रावसाहेब दानवे यांनी मला चुकीची वागणूक दिली. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना देऊनही त्यांनी काहीच केले नाही. फडणवीस यांना मी भाऊ मानतो पण त्यांनी जर माझी बाजू घेतली नाही. तर मला घर बदलावेच लागेल. दानवे आणि बापट यांच्या सांगण्यावरून फडणवीस यांनी भूमिका घेतली, तर मलाही माझे निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरेल.”

- Advertisement -

मी अजूनही भाजपमध्येच…

संजय काकडे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मिळण्यासाठी चाचपणी केली असली तरी अद्याप मी भाजपमध्येच असल्याचेही सांगायला ते विसरले नाहीत. ते म्हणाले की, “मी पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर नाराज असलो तरी मी पक्ष सोडलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी जर मला न्याय दिला नाही किंवा माझे तिकीट कापले तर मला इतर पर्याय मोकळे आहेत. तोपर्यंत मी भाजपमध्येच आहे.”

पुण्याची जागा काँग्रेसकडे – अजित पवार

या भेटीनंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल काकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, पुणे हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही मदत करू. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जो उमेदवार असेल त्याच्यापाठी सर्व कार्यकर्ते मनापासून काम करतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -