घरमहाराष्ट्रभाजपकडून स्वबळाचा नारा

भाजपकडून स्वबळाचा नारा

Subscribe

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा एल्गार

पुढील निवडणुका भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष अशा होणार असल्याचे ठणकावून सांगतानाच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवी मुंबईतील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात स्वबळाचा नारा दिला. आपल्याला एकट्यानेच विजयश्री मिळवायची आहे. कोणीही भाजपला थांबवू शकणार नाही, असा विश्वासही नड्डा यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

महाराष्ट्रातील चित्र तुम्हाला पालटायचे आहे. एक गंभीर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. ‘ऑल व्हर्सेस वन-भाजप’ अशी तयारी तुम्हाला करायची आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार हे खुर्चीसाठी एकत्र आले आहे. हे अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, असे सांगत जे. पी. नड्डा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

हे अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. त्यामुळे भाजपला संधी प्राप्त झाली असून पूर्ण ताकदीने आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असे सांगत भविष्यात युती न करता महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल, असा विश्वास जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. याचबरोबर, भाजपने आपली विचारसरणी बदलली नाही. इतर पक्षांनी बर्‍याचदा प्रसंगी वैचारिक भूमिका बदलली आहे.

आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. मात्र, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यासाठी वचनबद्ध आहोत, असेही जे. पी. नड्डा म्हणाले. यावेळी जे. पी. नड्डा यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. 370 कलममुळे फुटीरवाद्यांना बळ मिळत होते, अतिरेकी गतिविधी होत होत्या. जम्मू काश्मीरमध्ये आता देशातील कायद्यांची अंमलबजावणी होईल. तसेच, जम्मू काश्मीर बँकेची सुद्धा चौकशी होईल आणि ज्यांनी भ्रष्टाचार केले आहेत, ते जेलमध्ये जातील.

- Advertisement -

राज्यातील सरकार पाडण्याची गरज नाही. सरकारमधील विसंवादामुळे हे सरकार पडेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर भाजपचे अधिवेशन हे महत्त्वपूर्ण आहे. अधिवेशनातून नवीन ऊर्जा घेऊन आता सर्व कामाला लागतील, असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. राज्यात जनादेश मिळाला होता; पण काही लोकांनी मागच्या दाराने सरकार बनवले, अशी टीकाही विखेंनी शिवसेनेवर नाव न घेता केली.

खडसे दुसर्‍या रांगेत
भाजपच्या अधिवेशनात मंचावर आयाराम नेत्यांना पहिल्या रांगेत मान देण्यात आला होता. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुसर्‍या रांगेत स्थान देण्यात आले होते. सुरुवातीला चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक पहिल्या रांगेत, तर खडसे दुसर्‍या रांगेत होते.

अयोध्येत जा, रक्त उफाळून येईल फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला                                              अयोध्येला जा, तुमचे रक्त उफाळून येईल, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला. तर सीएएमुळे भटक्या, विमुक्तांना कसला त्रास होणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगावेच, असे आव्हानही त्यांनी दिले. रविवारी नवी मुंबईत भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता लवकरच राम मंदिर बांधलं जाणार आहे. अनेकजण अयोध्येत जाण्यासाठी निघाले आहेत. तुम्ही तिथे जा, कदाचित तिथे गेल्यानंतर तुमच्या हिंदुत्वाचं रक्त उफाळून येईल. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांना सुबुद्धी देवोत.

भाजपचे ऐकवण्याचे दिवस संपले आता सुनवण्याचे दिवस आले आहेत. उद्धवजी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवाल असं वचन बाळासाहेबांना दिले होते का?, तर बाळासाहेबांनी तुम्हाला कधी माफ केले नसते. एखाद्या विश्वासघाताने सरकार गेले, घाबरण्याचे कारण नाही. आपलं संपूर्ण जीवनचं विरोधकांचं आणि आपला डीएनएदेखील विरोधकांचा आहे. विरोधकाची भूमिका करण्यासाठी थेट मुकाबला करावा लागतो.या सरकारला जेरीस आणायला वेळ लागणार नाही. तुम्ही जनतेविरोधी भूमिका घेतली तर भाजप सरकारला सोडणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हा काळ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. 370 कलम आमच्यासाठी शल्य होते. काश्मीरच्या प्रत्येक चौकात तिरंगा डौलाने फडकत होता. या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत. आज काश्मीर मध्ये शांतता आहे. कुणी तरी म्हणत होत की रक्ताचे पाट वाहतील पण आता तेथे विकासाचे पाट वाहत आहेत, असं फडणवीसांनी सांगितले.

खोटं बोल पण रेटून बोल, जवाहरलाला नेहरु यांनी लियाकतसोबत करार केला होता की, जर पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि जैन धर्मियांवर जर अत्याचार झाला त्यांना आम्ही भारतात घेऊ. पण काही लोक सत्तेविना मासळीसारखे तडफडत आहेत. कुणाचीही नागरिकता काढून घेतली जाणार नाही. असे असून अनेकजण चुकीची माहिती पसरवत आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितले.

काही पक्ष सत्तेत येण्यासाठी तेढ निर्माण करतात. ते सत्तेविना राहू शकत नाहीत. मोठे मोठे लोकं सत्त्तेसाठी खोटे बोलतात. शरद पवारांना सीएएवर सर्व काही माहिती आहे. लोकांना कन्फ्युज करा, त्यांची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी मोदींची माफी मागा, देशाची माफी मागा, असं फडणवीस म्हणाले.

शरद पवार म्हणतात,सीएएमुळे भटक्यांचे काय होणार. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांना कायदा माहीत नाही का. लोकांना जेंव्हा समजवता येत नाही तर त्यांना गोंधळात टाका, असे सांगत फडणवीसांनी पवारांवर टीका केली.जो मॅच जिंकून देतो आपण त्यांना कॅप्टन म्हणतात. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण मॅच जिंकलो. कालही विनिंग टीमचे कॅप्टन होता आजही तुम्ही विनिंग टीमचे कॅप्टन आहात. भाजपचं सरकार पुन्हा आणल्याशिवाय राहणार नाही, असं फडणवीस यांनी सांगत चंद्रकांत पाटील यांचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -