जनतेच्या समस्या भाजपसरकारच्या गळी उतरवणार – जयंत पाटील

जनतेकडूनच थेट प्रश्न मागवण्यात येत असून हे प्रश्न आणि समस्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप सरकारच्या गळी उतरवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.

Mumbai
NCP MLA Jayant Patil
मंत्री जयंत पाटील यांचे टिकास्त्र

दुष्काळ… महागाई… इंधनाचे वाढते दर… महिला सुरक्षितता… आरक्षण… शेतकऱ्यांचे… सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत त्यामुळे जनतेकडूनच थेट प्रश्न मागवण्यात येत असून हे प्रश्न आणि समस्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप सरकारच्या गळी उतरवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी देतानाच राज्यातील जनतेने आपले प्रश्न आणि समस्या पाठवण्याचे आवाहनही केले. राज्यातील भाजप सरकार सत्तेत येवून चार वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहेत.

हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रश्न

विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवणार आहेत, शिवाय सरकारला जाब विचारण्याचे काम एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस विविध आंदोलनांच्या माध्यमातून करतो आहे. परंतु राज्याच्या जनतेलाही आपल्या भागातील, आपल्या गावातील जिल्ह्यातील समस्या आणि अनेक प्रश्न सरकारदरबारी पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीने एक मंच देण्याचा प्रयत्न केला असून सर्वसामान्यांचे हे प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमातून मांडण्याची भूमिका जाहीर केली आहे.

थेट एनसीपीला सांगा समस्या

त्यामुळे सरकारला काही प्रश्न विचारायचे असल्यास किंवा स्थानिक समस्यांबाबत सरकारकडून प्रतिसाद अपेक्षित असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई पक्ष कार्यालयात जनता संपर्क साधू शकते वा आम्हाला [email protected] या ई-मेलवर प्रश्न मेल करू शकते, असे आवाहन जयंतराव पाटील यांनी केले आहे.

राज्यातील जनतेचा अावाज ऐकवणार

आम्ही राज्यातील जनतेकडून आलेले हे प्रश्न, त्यांच्या मागण्या, समस्या सरकारसमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. हा आवाज फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही तर राज्यातील जनतेचा असणार आहे, असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.