घरमहाराष्ट्रनाशिक३०० हिंदूंनी बजावले मुस्लीम रुग्णांसाठी रक्तदानाचे कर्तव्य

३०० हिंदूंनी बजावले मुस्लीम रुग्णांसाठी रक्तदानाचे कर्तव्य

Subscribe

रमजान ईद विशेष : ‘आपलं महानगर’च्या वृत्तानंतर करोनाकाळात सामाजिक सलोखा

ये मुसलमान का खून और ये हिंदू का खून.. बता इसमें मुसलमान का कौनसा और हिंदू का कौनसा है? बनाने वालेने इसमें फर्क नहीं किया, तू कौन होता है फर्क करनेवाला?.. ‘क्रांतिवीर’ चित्रपटातील नाना पाटेकरचा हा गाजलेला संवाद.. हिंदू-मुस्लीम धार्मिक सलोखा टिकून राहण्यासाठी हा संवाद प्रेरणादायी ठरावा. या संवादाप्रमाणेच धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्याचे महत्कार्य नाशिकच्या ३०० रक्तदात्यांनी केले आहे. ‘आपलं महानगर’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मालेगावसाठी दोन आठवड्यांत ज्यांनी रक्तदान केले त्यातील ९५ टक्के रक्तदाते हे हिंदूधर्मिय असल्याचे रक्तपेढ्यांचे व्यवस्थापक सांगतात. महत्त्वाचे म्हणजे मालेगावमध्ये रक्ताची गरज ज्यांना आहे असे बहुतांश रुग्ण मुस्लीमधर्मीय आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी हिंदू रक्तदात्यांनी सामाजिक दायित्व निभावल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा सलोखा केवळ राज्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत ठरावा.

मालेगावमध्ये करोनाने थैमान मांडले आहे. आजवर ६८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यातील ४३ मालेगावकरांना मृत्यूला कवटाळावे लागले आहे. मालेगावमध्ये करोना झालेल्या रुग्णांमध्ये मुस्लीम धर्मीयांचे प्रमाण मोठे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात धार्मिक वाद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. विशेषत: ज्यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवून करोनासारख्या संकटावर सामूहिक प्रयत्नाने मात करणे गरजेचे होते, दुर्दैवाने त्याच वेळी ‘दिल्लीतील मरकज’ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणार्‍यांना आयतेच कोलित दिलेे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लीम असा वाद सुरू झाला. सोशल मीडियावर या वादाचे वारंवार पडसाद उमटत असतात. किंबहुना त्यातून धार्मिक दंगली घडण्याचीही भीती सुजाण नागरिकांना डाचत आहे. एकीकडे हिंदू आणि मुस्लिमांमधील धार्मिक दरी वाढवण्याचे षड्यंत्र रचले जात असताना दुसरीकडे सर्वसामान्य नाशिककर मात्र संकटकाळात आपली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

मालेगावमध्ये करोनाचे संकट अधिक गडद होत असतानाच तेथील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठाही दोन आठवड्यांपूर्वी संपण्याच्या मार्गावर होता. अशा परिस्थितीत मालेगावमध्ये रक्तदान शिबिरे घेतल्यास ते अधिक धोक्याचे होणार होतेे. आज मालेगावमध्ये करोनाची बाधा कुणाला नसेल हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे रक्तदानाव्दारे करोनाचे संक्रमण होण्याचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन नाशिकमधील रक्तपेढ्यांनी मालेगावसाठी लोन स्वरुपात रक्त देणे गरजेचे बनले आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये प्रतिबंधित क्षेत्र नाहीत अशा परिसरातूनही मालेगावकरांसाठी रक्तदान शिबिरे घेणे आवश्यक होणार आहे. याबाबत ‘आपलं महानगर’ने १५ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करताच रक्तदान करण्यासाठी अनेक दाते पुढे आले. रक्ताला धर्म नसतो अशा विचारांनी काहींनी वैयक्तिकरित्या रक्तदान केले. तर काहींनी शिबिराचे आयोजन केले. जिल्हा रुग्णालयात १०० पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान केले. याशिवाय शहरातील अर्पण, जनकल्याण, नाशिकसह सहा रक्तपेढ्यांमध्येही एकूण ३०० दात्यांनी मालेगावसाठी रक्तदान केले आहे. यातील ९५ टक्के रक्तदाते हे हिंदू असल्याचे रक्तपेढ्यांच्या व्यवस्थापनाने सांगितले.

धार्मिक दंगली घडवण्याचा कट उधळणार?
मालेगावमधील सगळेच करोनाबाधित मुस्लीमधर्मीय आहेत असे नाही. मात्र, मुस्लीम बांधवांचे प्रमाण मोठे आहे. ही बाब नाशिकमधील रक्तदात्यांनाही माहीत आहे. तरीही रक्तदानासाठी ही मंडळी पुढे आली आहेत. त्यामुळे धार्मिक दंगली घडवून आणण्याचा कट रचणार्‍यांच्या मनसुब्यांवर ही समजदार मंडळीच पाणी फिरवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

मालेगावमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नाशिकमधील नागरिकांनी, संस्थांनी वा संघटनांनी चांगल्या प्रमाणात रक्तदान केले आहे. परंतु आता अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच, शस्त्रक्रियाही सुरू आहेत. त्यामुळे रक्तसाठा कमी होत आहे. परिणामी मालेगावला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. हा पुरवठा वाढवण्यासाठी ८८८८ ८१२ ३२० या क्रमांकावर संपर्क साधावा.
– गौरव शितोळे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा रुग्णालय

३०० हिंदूंनी बजावले मुस्लीम रुग्णांसाठी रक्तदानाचे कर्तव्य
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -