ब्लू व्हेल गेमचा आणखी एक बळी; नागपुरात १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

ब्लू व्हेल या गेममुळे नागपुरात एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Maharashtra
blue well game
ब्लू व्हेल गेम (सौजन्य-पत्रिका)

ब्लू व्हेल या गेममुळे नागपुरात एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खेळाचे टास्क पूर्ण करण्यासाठी या मुलीने आपल्या हाताची नस कापून आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसी जोनवाल असे या मुलीचे नाव असून तिचे वडील एअरफोर्समध्ये हवालदार आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून मानसी ब्लू व्हेल गेम खेळत होती. केंद्र सरकारने या गेमवर भारतात बंदी घातली आहे. कारण देशभरात या गेममुळे बळी गेल्याच्या काही घटना मागील वर्षी घडल्या आहेत. तरीही नागपुरात एका अल्पनयीन मुलीचा या खेळामुळे जीव गेला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती डीसीपी निलेश भरणे यांनी दिली.

वाचा : मोमो गेमविरोधात बंगाल सरकार कारवाईच्या तयारीत

गेम बनवणारा तुरूंगात 

हा गेम रशियातून जगभरात पसरला. आत्तापर्यंत या गेममुळे २०० पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे. दि ब्लू व्हेल गेम २५ वर्षांच्या के. फिलीप बुडेकिन या तरुणाने २०१३ साली बनवला होता. रशियामध्ये २०१५ साली या गेमने पहिला बळी घेतला. त्यानंतर फिलीपला तुरूंगवास ठोठावण्यात आला होता. फिलीपच्या मते हा गेम समाजातील बायोलॉजिकल कचऱ्याच्या साफसफाईसाठी आहे असे त्याने म्हटले होते.

वाचा : सावधान! तुमच्या व्हॉट्सअॅपवर Momo येते आहे

ब्लू व्हेल गेम, पोकेमन गो, मोमो – जीवघेणे खेळ

या गेमने भारतात घेतलेला पहिला बळी म्हणजे मुंबईतील मनप्रित सिंग. या मुलाने ब्लू व्हेलच्या आहारी जाऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा या राज्यांतून अशा घटना समोर आल्या होत्या. ब्लू व्हेल गेमनंतर मोमो गेम देशभर व्हायरल झाला होता. मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ अनेक लहानगी तसेच तरुण मुले खेळताना आढळली. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा धोकादायक गेम सर्वत्र पसरला. या धोकादायक मोमो चॅलेंजमुळे भारतात दोन मुलांचा जीव गेला होता. हा गेम कोलकात्यासह पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला होता. या मोमोविरोधात पश्चिम बंगाल सरकार, पश्चिम बंगाल पोलिसांनी कंबर कसली. शिवाय पोकेमन गो चॅलेंजसारखे गेम्स मुलांच्या जीवावर उठले आहेत.