प्रेयसीवर आधी फेकलं Acid, नंतर पेट्रोल टाकून पेटवून दिलं; भामट्या प्रियकराला अटक!

आपल्या प्रेयसीवर Acid फेकून नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून देणाऱ्या प्रियकराला बीड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रियकराने नक्की असं का केलं? याचं कारण कळू शकलेलं नाही. मात्र, त्याच्या चौकशीतून सत्य समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पीडित तरूणी या घटनेत ५० टक्के भाजली असून तिच्यावर बीडमधल्याच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, Acid हल्ला आणि पेट्रोल यामुळे शरीराचं अंतर्गत नुकसान झाल्यामुळे अखेर उपचारांदरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला असून त्या आधारावर आरोपीची चौकशी केली जात आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्यानंतर रविवारी दुपारी घटनेच्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नक्की घडलं काय?

पीडित तरूणी तिचा प्रियकर अविनाश राजुरे याच्यासोबत बीडमधल्या आपल्या गावी परत येत होती. हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे दोघे येळंबघाटात खडी क्रशरजवळ मुक्कामी थांबले. मात्र, रविवारी पहाटे ३ च्या सुमारास आरोपी अविनाश राजुरेने पीडितेच्या चेहऱ्यावर Acid फेकलं. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं आणि घटनास्थळावरून पळ काढला.

तब्बल १२ तास तरुणी तशाच अर्धवट जळालेल्या अवस्थेत विव्हळत एका खड्ड्यात पडली होती. मात्र, कुणाची तिकडे नजर गेली नाही. दरम्यान, रविवारी दुपारी २ च्या सुमारास गावकऱ्यांना कण्हण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी पाहिलं असता खड्ड्यात पीडित तरूणी सापडली. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केलं.

तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर तिला जिवंत जाळण्याच्या बीडमधील घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही स्थितीत कडक शिक्षा व्हावी यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्टा’त खटला चालवण्यासंदर्भात सूचना केली आहे. या प्रकरणी मी स्वतः लक्ष ठेवून आहे.

अनिल देशमुख, गृह मंत्री

आरोपी अविनाश राजुरे बीडच्या देगलूर तालुक्यातल्या आदमपूरमध्ये एका ढाब्यावर बसून जेवत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ढाब्यावर जाऊन अविनाशला अटक केली. दरम्यान, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.