घरCORONA UPDATEकोरोनाला न घाबरता 'ती' गरजूंना देते ओला टॅक्सीची सेवा

कोरोनाला न घाबरता ‘ती’ गरजूंना देते ओला टॅक्सीची सेवा

Subscribe

समाजाचे आपण काही देणं लागतो, या भावनेतून कोरोनाच्या या महामारीत देखील विद्या शेळखे महिला, दिव्यांग, वृद्धांना ओलाची सेवा देत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहे. शहरासह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम अन् निर्मनुष्य आहेत. एसटी बस, प्रवासी वाहतूक गाड्यांसह देशभरातील रेल्वे सेवा बंद आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत गेल्या दोन महिन्यापासून मुलुंडची एक महिला ओला चालक मुंबईत अडकून पडलेल्या दिव्यांग, महिला आणि गरजू लोकांना आपली सेवा देत आहे. प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप आणि सुरक्षित पोहचविण्याचे काम करत आहे. मुलुंडच्या या जिगरबाज वाघिणीचे नाव आहे, विद्या अनिल शेळके. घरात दोन लहान मुले असून देखील ती भीती न बाळगता या संकटकाळात आपली सेवा महाराष्ट्रातील जनतेला देत आहे. मुंबई – पुणे, मुंबई – नाशिक, मुंबई- औरंगाबाद, मुंबई – कोल्हापूर असा लांब पल्याचा प्रवास देखील ती करत आहे.

औरंगाबाद जिल्हातील वैजापूर तालुक्यातील उंदिरवाडी या छोट्याशा गावात विद्याचा जन्म झाला. मात्र कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. काबाड कष्ट करून कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण विद्याने घेतले. २००९ मध्ये तिचा विवाह अनिल शेळके यांच्याशी झाला. हे दांपत्य सध्या मुंबई महानगरातील मुलुंडमध्ये वास्तव्याला आहे. विद्याच्या पतीकडे स्वतःचे वाहन आहे. ते दररोज नाशिक ते मुंबई शेतमालाची वाहतूक करतात. विद्याला १० वर्षांचा आदी नावाचा मुलगा आणि ८ वर्षांची आरोही नावाची मुलगी आहे. या महागाईच्या काळात घरखर्च, मुलांच्या शैक्षणिक खर्च पाहता नुसत्या पतीच्या मिळकतीवर संसाराचा गाडा चालविणे अवघड जात असल्याने विद्याने स्वतः रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावण्याचे ठरवले. २०१५ ला ती रिक्षा चालवायला लागली. मात्र या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी असल्यामुळे अनेक अडचणी विद्याला येत होत्या. त्यामुळे कर्ज घेऊन तीने ओला टॅक्सी घेतली. त्यानंतर २०१६ पासून ते आजपर्यंत विद्या ओला चालवत आहे.

- Advertisement -
vidya shelake ola
विद्या शेळके ओला चालविताना

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्रावर आलेल्या संकटात आपलही काही योगदान असावं. या हेतूने विद्या सेवा देत आहे. विशेष म्हणजे दिव्यांग, वृद्धांना आणि महिलांना प्राधान्य देत ओलाची सेवा देत आहे. ज्यांना मदतीची गरज आहे, अशांसाठी विद्या टिकटॉक, फेसबुक अन्य सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करते. त्या माध्यमातून अनेकांनी विद्याशी संपर्क साधून मदत मागितली आहे.

महिला व दिव्यांग नागरिकांना सुखरूप घरी पोहचवले

विद्याने दैनिक आपलं महानगरशी बोलताना या लॉकडाऊन काळात काही कटू अनुभव सुद्धा शेअर केले. विद्याला तीन दिवसा अगोदर नाशिक वरून एका महिला प्रवाशांचा कॉल आला. त्या महिलेला मुंबईच्या महालक्ष्मीला जायचं होत. त्या महिलेला पतीने मुलांसहीत घराबाहेर काढले होते. यासंबंधित महिलेने नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. लॉकडाऊनमध्ये दोन मुलांना घेऊन तिला माहेरी जायचं होतं. तिने सोशल मीडियावरून विद्याला संपर्क केला. विद्याने तिला नाशिकहून सुखरूप माहेरी पोहोचवले. तसेच या लॉकडाऊन काळात मुंबईत अडकलेल्या अनेक दिव्यांग आणि वृद्ध कुटुंबियांना सुरक्षित घरी पोहचवले आहे. विद्याचा या कार्यामुळे मुलुंडमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षांवर होत आहे.

- Advertisement -

फिजिकल डिस्टन्सचे पालन

“ओला चालकाचे काम करताना मी फिजिकल डिस्टन्सचे पालन करत आहे. प्रवाशांना सॅनिटाझर, मास्क आणि इतर सुरक्षेच्या गोष्टी मी माझ्या वाहनात ठेवते. तसेच दोन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात नाही. प्रवाशांची पूर्ण सुरक्षेची जबाबदारी मी स्वतः घेते”, अशी माहिती विद्याने दिली.

कोरोनाचा संकट काळात समाजाला माझ्या मदतची गरज आहे, याची मला जाणीव झाली. मी माझ्या मुलांना गावी आई- वडिलांकडे सोडून आले. गेल्या दोन महिन्यापासून गरजू नागरिकांना शहरातून घरी पोहोचविण्याचे काम करत आहे. कारण हे माझं कर्तव्य असून या संकट काळत मदत म्हणून सेवा देत आहे. लॉकडाऊन काळात अनेक अडचणी येतात. मात्र माझा या चांगल्या कार्याला पोलिसांकडून आणि नागरिकांकडून सहकार्य मिळत असल्यामुळे हे कार्य करणे शक्य होत आहे. – विद्या शेळके, ओला चालक, मुलुंड

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -