Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर महाराष्ट्र ‘दादली’ च्या कठड्याला दोरीचा आधार

‘दादली’ च्या कठड्याला दोरीचा आधार

शाळकरी मुलांसाठी पुल धोकादायक

Mumbai

शहराजवळील दादली पुलावरील लोखंडी सरंक्षक कठडे ऐन पावसाळ्यात आलेल्या पुरात वाहून गेल्यामुळे सध्या या पुलावरून शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला आहे. रस्त्यावरून वाहने ये-जा करीत असल्याने मुले दोरी बांधलेल्या कठड्याच्या बाजूने पदपथावरून एकटे किंवा घोळक्याने आणि बरोबरीने चालत असताना या ठिकाणी तोल जाऊन किंवा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

म्हाप्रळ आणि विन्हेरे विभागांना जोडणार्‍या दादली पुलाची दुरवस्था झाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराला पुराने वेढा दिला. पुराचे पाणी या पुलावरून गेल्याने तात्पुरत्या स्वरुपात उभे केलेले लोखंडी सरंक्षक कठडे वाहून गेले. यामुळे पूर ओसरेपर्यंत या पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. कठडे वाहून गेल्याने या पुलावरून नागरिकांना चालत जाणे धोकादायक ठरत आहे. या पुलावरून दादली, शिरगाव, चोचींदे गावातील ग्रामस्थ, तसेच शेकडो विद्यार्थी ये-जा करीत असतात. पुलाच्या दोन्ही बाजूकडील सरंक्षक कठडे मोडून गेल्याने या ठिकाणी दोरी बांधण्यात आली आहे. मात्र ऐन सायंकाळी आणि पहाटेच्या सुमारास ही दोरी दिसणे अशक्य असल्याने चालताना धोका निर्माण झाला आहे.

या पुलावरून आजही अवजड आणि मोठ्या वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असल्याने पुलाच्या पदपथावरून चालताना मुलांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती अशी होते. पहाटेच्या सुमारास अनेक नागरिक फिरावयास जात असतात. त्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दादली आणि परिसराच्या गावातील नागरिकांना या पुलावरून चालणे नकोसे झाले आहे. या पुलाची दुरुस्ती केली जाणार असून, याबाबत प्रस्ताव मंजूर झाला असला तरी तूर्त कठड्यांचे काम होणे गरजेचे आहे.

दादली पुलावरून सायंकाळी घरी जाताना कठडे नसल्याने अंधुक प्रकाशात बाजूचा अंदाज येत नाही. हिच स्थिती भल्या सकाळीदेखील असते. शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात महाडमध्ये येत असतात. ते मौजमजा करीत पुलावरून येत असताना एकीकडे नदीचा खोल प्रवाह असल्याने त्यांना, तसेच नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
-शेखर पाटील, स्थानिक नागरिक

एक प्रतिक्रिया

  1. उद्या कोणीही पुलावरून खाली पडला तर आमच्याकडे संरक्षणासाठी दोरी बांधली होती हे कारण तरी असेल ना. उगाच दोष कशाला काढता? मागे नवी मुंबईच्या नव्या खाडी पुलाचं कठडा नसताना ही उद्घाटन झाल्यानंतर लगेचच रात्री एक जीप खाडीत पडून दह बारा लोक मृत्युमुखी पडले होते. पण कठडा नसताना हे जीप नेलीच कशी हे कारण पुढे केले होते. मोहन देवळे.

Comments are closed.