घरमहाराष्ट्रबुलेट ट्रेन सर्व्हेला पुन्हा पालघरवासीयांचा चले जाव

बुलेट ट्रेन सर्व्हेला पुन्हा पालघरवासीयांचा चले जाव

Subscribe

पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनला तीव्र विरोध असून शुक्रवारी सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना गावकर्‍यांनी माघारी पाठवले. आतापर्यंत पाचवेळा सर्व्हे करण्यापासून रोखून गावकर्‍यांनी विरोधाची धार कायम ठेवली आहे. पालघरवर लादल्या जाणार्‍या सर्व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात ठराव घेणारे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन बुधवारी पार पाडले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कल्लाळे येथे बुलेट ट्रेनचा सर्वे करण्याचा प्रयत्न झाला. कल्लाळे येथे बुलेट ट्रेनचा सर्वे करायला अधिकारी आल्याची माहिती मिळताच आदिवासी बांधव, कार्यकर्ते कल्लाळे गावात धावून गेले.

आंदोलनाचे नेते काळूराम काका धोदडे, शशी सोनवणे, नीता काटकर, भास्कर दळवी, मोरेशवर दौडा, संतोष मानकर आणि इतर सर्व कार्यकर्त्याशी अधिकार्‍यांनी चर्चा केली. याप्रसंगी काळूराम धोदडे यांनी बुलेट ट्रेन कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. तसेच सर्वेला विरोध केला. शशी सोनवणे यांनी बुलेट ट्रेन देशहिताची नाही, अशी भूमिका घेतली. बुलेट ट्रेन विरोधी ग्रामसभा ठराव अनेकवेळा पास केले असताना वारंवार सर्वे करायचे प्रयत्न का केले जातात, असा प्रश्न उपस्थित केला गेला.

- Advertisement -

देश आर्थिक संकटात असताना, एका व्यक्तीच्या हौसेसाठी आदिवासी, शेतकरी भूमिपुत्रांना उध्वस्त करून बुलेट ट्रेन होऊ देणार नाही, असे निक्षून सांगण्यात आले. शेवटी बुलेट ट्रेनचे अधिकारी 5 व्यांदा सर्व्हे न करताच रिकाम्या हाताने परतले.
नुकत्याच झालेल्या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनात छत्तीसगढच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी अनुसूचित क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी आदिवासींनी लढले पाहिजे, असे आवाहन केले होते. त्याच भूमिकेतून धोदडे यांच्या नेतृत्वात बुलेट ट्रेन विरोधात आंदोलन गेली साडेतीन वर्षे सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -