घरमहाराष्ट्रनव्या सरकारच्या मंत्र्यांसाठी बंगले ठरले

नव्या सरकारच्या मंत्र्यांसाठी बंगले ठरले

Subscribe

भुजबळ पुन्हा ‘रामटेक’मध्येच

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्या नेत्याला कोणता बंगला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. अखेर उद्धव ठाकरे यांच्या सोबत शपथ घेतलेल्या नेत्यांपैकी एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना सामान्य प्रशासन विभागाने बंगल्याचे वाटप केले आहे.तसेच विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना देखील बंगला देण्यात आला आहे. मात्र शिवसेनेचे सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेत थोरात आणि नितीन राऊत या तीन मंत्र्यांना अद्याप बंगल्याचे वाटप झालेले नाही.पदमुक्त झाल्यानंतर वाटप केलेले निवासस्थान १५ दिवसांच्या कालावधीत रिक्त करून देणे बंधनकारक असते.

नव्या मुख्यमंत्र्यांसाठी ‘वर्षा’

- Advertisement -

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य हे आतापर्यंत वर्षा बंगल्यावर राहिले आहे.महाराष्ट्रातील सत्ताकेंद्र म्हणून वर्षा बंगल्याकडे पाहिले जाते. त्यामुळे दरवेळी प्रमाणे याही वेळी नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’ बंगल्याचा ताबा घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानी जाणार की ‘मातोश्री’ या त्यांच्याच निवासस्थानी राहणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यासाठी जे जे करावे लागणार ते मी करणार असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यामुळे ते वर्षा या निवासस्थानी कधी जातात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

देवेंद्र फडणवीसांना ‘सागर’ बंगला

- Advertisement -

छगन भुजबळ यांच्या प्रमाणेच अन्य मंत्र्यांनाही बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे.त्यामुळे आता फडणवीस यांना वर्षा वरून सागरवर जावे लागणार आहे.

भुजबळांचे वास्तव्य ‘रामटेक’मध्येच

महाराष्ट्र विकास आघाडीचे नवे मंत्री मंत्री छगन भुजबळ यांचा मुक्काम पुन्हा एकदा ‘रामटेक’मध्येच असणार आहे. भुजबळ हे आघाडीच्या काळात मंत्री असताना ‘रामटेक’ येथेच वास्तव्यास होते. मलबार हिल परिसरातील नारायणराव दाभोळकर मार्गावरील ‘रामटेक’ या शासकीय बंगल्याचे सगळ्यांना आकर्षण असते. नवे सरकार मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानापेक्षा समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला नेहमीच उजवा ठरतो आहे. मात्र या बंगल्याचा इतिहास पाहिला तर बरेच नेते नको रे बाबा रामटेक असेच म्हणतात. आघाडीच्या काळात छगन भुजबळ हे ‘रामटेक’मध्येच राहत होते. मात्र गेल्या काही वर्षात ‘रामटेक’ बंगल्यात राहणार्‍या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. यामध्ये एकनाथ खडसे, खुद्द छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा रामटेक बंगला मिळालेल्या भुजबळांना हा बंगला मानवेल का? हे पहावे लागेल.

जयंत पाटलांना सेवासदन एकनाथ शिंदेंना रॉयल स्टोन

यामध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना ‘सेवा सदन’, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना ‘रॉयल स्टोन’ या बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. जयंत पाटील यांना वाटप झालेल्या ‘सेवासदन’ मध्ये यापूर्वीच्या सरकारात विनोद तावडे यांचे वास्तव्य होते. तर पंकजा मुंडे यांना वाटप करण्यात आलेल्या ‘रॉयल स्टोन’ बंगल्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -