या निस्वार्थी सेवेला सलाम! रुग्णसेवेसाठी व्यावसायिक धंदा सोडून झाला वॉर्डबॉय!

businessman becomes wardboy to serve corona patients

कोरोना काळात रुग्णसेवा किंवा कोणत्याही प्रकारची समाजसेवा केल्यावर अनेक जण त्याचा गाजावाजा करताना पाहायला मिळतात. मग ते सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं असो किंवा व्हिडिओ, फेसबुक लाईव्ह करून त्याची हवा करणं असो. पण असेही अनेक जण आहेत जे अत्यंत शांतपणे कुठेही चर्चा न करता त्यांचं निस्वार्थी काम सुरू ठेवतात. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडचे रहिवासी असलेले सुभाष गायकवाड हे त्यातलेच एक. खरंतर काही महिन्यांपूर्वीपर्यंत सुभाष गायकवाड एक व्यावसायिक होते. महिना ६० हजार रुपये कमवत होते. पण एका घटनेनं त्यांचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. रुग्णसेवेच्या इच्छेने ते इतके झपाटले की त्यांनी ६० हजार रुपयांची नोकरी सोडून १६ हजारांची नोकरी स्वीकारली. रुग्णालयात फरशी पुसायला, झाडलोट करायला सुरुवात केली. ते रुग्णालयाचे वॉर्डबॉय झाले!

बरोबर चार महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात…

सुभाष गायकवाड यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सलग १३ दिवस ताप न ओसरल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आले. आधी तीन दिवस जनरल वॉर्डमध्ये ठेवलं. पण प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडू लागली. चिंताजनक झाली. त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं. आपण यातून आता जिवंत बाहेर पडू, यावरचा त्यांचा विश्वास उडाला होता. तसा मेसेज देखील त्यांनी त्यांच्या पत्नीला पाठवला. पण ५ दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पुढे अजून ५ दिवस त्यांना जनरल वॉर्डमध्ये ठेवलं आणि ते ठणठणीत होऊन रुग्णालयाच्या बाहेर पडले.

होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर…

गायकवाड यांनी वर्तमानपत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची एक जाहिरात पाहिली. जाहिरातीत वॉर्डबॉयच्या पदासाठी इच्छुकांना आवाहन करण्यात आलं होतं. तिथेच गायकवाड यांचं आयुष्य फिरलं. या अनुभवाबद्दल गायकवाड म्हणतात, ‘माझ्या आयुष्यात मी खूप सारे घाव झेलले आहेत. मला एवढं कळलंय की जर तुम्ही जिवंतच राहिला नाहीत, तर तुमच्या पैशाला काहीही किंमत नाही. देवानं कोरोनातून वाचवून मला दुसरी संधी दिली आहे. आपल्या वैद्यकीय क्षेत्रानं मला नवं आयुष्य दिलं आहे. आणि मला ते रुग्णांच्या सेवेमध्ये घालवायचं आहे’. जाहिरात पाहिल्यानंतर लागलीच गायकवाड यांनी भोसरी रुग्णालयात जाऊन अर्ज भरला. आणि रीतसर निवड प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी ती नोकरी मिळवली देखील!

स्वत:च्या स्कॉर्पिओतून रुग्णालयात येतात!

आता गायकवाड स्वत:च्या स्कॉर्पिओ कारमधून रुग्णालयात येतात. वॉर्डबॉयचा ड्रेस घालतात आणि फरशी पुसायला, झाडलोट करायला सुरुवात करतात. मुंबईतल्या एका सेक्युरिटी एजन्सीमध्ये पार्टनर असणारे गायकवाड या एजन्सीची पुण्याची ब्रँच सांभाळत होते. त्यांच्या हाताखाली २५० लोकं काम करत होते. पण तेच गायकवाड त्यांच्या रुग्णसेवेच्या पहिल्याच दिवशी हातात झाडू घेऊन रुग्णालयातले वॉर्ड झाडत होते. या निस्वार्थी सेवेला सलाम!