भक्तांना वेध बाप्पांच्या आगमनाचे..

Mumbai
थर्माकोलसह चिनी वस्तूंना बाय बाय

गणपती बाप्पांचे आगमन होण्यास आठ दिवसांचा कालावधी असला तरी भक्तांना त्याच्या आगमनाचे आतापासून वेध लागले आहेत. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारची सुट्टी साधून अनेकांनी दुकाने गाठल्याने बाजारांतून गर्दी झाली होती. यावेळी ग्राहकांनी मखरासाठी चिनी वस्तूंऐवजी देशी बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य दिले आहे. थर्माकोललाही ग्राहक बाय बाय करीत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

येत्या सोमवारी, २ सप्टेंबरपासून यंदाच्या गणेशोत्सवाला प्रारंभ, तर गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी उत्सवाची सांगता होईल. यावर्षी उत्सवावर पावसाचे सावट असले तरी उत्साह कमी होईल, असे कोणतेही चिन्ह दिसत नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाची वेगाने तयारी सुरू असून, काही ठिकाणी ती पूर्णत्वाला गेली आहे. हमरस्त्यांवर मंडपांतून साजरा होणार्‍या उत्सवाच्या तयारीवर पाऊस मधूनच पाणी फेरत असला तरी पाऊस थांबताच कामाला वेग येत आहे. घरगुती गणेशोत्सवाच्या तयारीसाठी घरांची साफसफाई, रंगरंगोटी, नवीन साहित्य खरेदी सुरू आहे. सतरंज्या, चटया, शोभेची आकर्षक फुले, ढोलकी विकणार्‍या फिरस्त्यांची सध्या चलती असल्याचे पहावयास मिळत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व थर्माकोलची आरास याला पर्यावरणप्रेमी, तसेच तज्ज्ञांकडून वारंवार विरोध होत असल्याने यावर्षी शाडू मातीच्या मूर्तींना चांगली मागणी आहे. दरवर्षी हे प्रमाण वाढत असल्याचे मूर्तीकार सांगतात. थर्माकोलचे मखर कितीही आकर्षक असले तरी त्याचे विघटन होत नसल्याने थर्माकोल नकोच, या मानसिकतेतून बहुसंख्य भक्तांनी थर्माकोलला बाय बाय केल्याचे दिसत आहे. शिवाय यावेळी भारतीय बनावटीचे मखरासाठी वीज रोषणाईचे चित्तवेधक साहित्य बाजारात आले आहे. ग्राहकांनी चिनी बनावटीच्या रोषणाईच्या साहित्याकडे चक्क पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत मखर साहित्याच्या किमतीत फारशी, जवळ-जवळ कोणतीही वाढ झाली नसल्याची माहिती नागोठणे येथील अग्रवाल जनरल स्टोअर्सचे अमित दौलत मोदी यांनी ‘आपलं महानगर’ला दिली. आर्थिक मंदीचा परिणाम व्यावसायिकांवर झाल्याने उत्पादक किंमत वाढविण्यास धजत नसल्याचे ते म्हणाले. थर्माकोल आता हळूहळू मोडीत निघत असल्याने रोषणाई साहित्य विक्री तेजीत आहे. अनेकजण यू-ट्युबवर पाहून घरगुती रोषणाई करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. वेलवेट टिकली कापड, मूर्तीमागील पडदे, जिलेटिन पेपर माळा, बुके व फुलांना चांगली मागणी आहे. या शिवाय १ ग्रॅममधील सोन्याचा मुकुट, कुंदन स्टोन साखळी, फॅन्सी सॅटिन हार, मोती कंठी, जास्वंदीची फुले, बाजू बंद अशा साहित्याला भक्तांची खास पसंती आहे.

दरम्यान, पावसामुळे मरगळलेल्या जिल्ह्यातील बाजारपेठा आता ‘बोलू’ लागल्या असून, पूजा साहित्याची दुकानेही सजली आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत बाजारांतून फळा-फुलांचाही बहर येणार असल्याने एकूणच वातावरण गणपतीमय होऊ लागले आहे.

चिंता रस्ते व लाईटची..
जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह जिल्हा व गाव मार्गांची अनेक ठिकाणी दैना झाल्याने मोठ्या मूर्ती नेताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहरांतून येणारी पाहुणे मंडळी घरी वेळेत पोहचतील का, अशी चिंता अनेकांना वाटत आहे. शिवाय महावितरणचा वीज पुरवठा कधीही व अनिश्चित काळासाठी खंडित होत असल्याने विजेचीही चिंता सर्वांना लागून राहिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here