घरमहाराष्ट्रव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

Subscribe

महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची/अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सध्याचे वातावरण अद्याप कोणतीही परीक्षा घेण्यास अनुकूल नसल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे.

विद्यापीठाच्या सूत्रानुसार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. तसंच यामध्ये त्यांनी एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीलाही राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. आपणास माहित आहेच की,  कोविड १९ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, (मुंबई महानगरपालिका क्षेत्र), पुणे महापालिका क्षेत्र, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर सारख्या  मोठ्या शहरामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे २०१९-२० या वर्षाच्या अंतिम परिक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

सध्याचे वातावरण हे कोणत्याही परिक्षांसाठी आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. विषाणु प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीत परिक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, परिक्षा घेणारी ॲथोरटी, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढवणारं आहे. पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ जून २०२० रोजी पंतप्रधानांशी साधलेल्या संवादाची आठवण करून देतांना म्हटलं की, या व्हिडीओ कॉन्फरंसिगमध्येही मी आपल्याला अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करून राष्ट्रीय स्तरावरील या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्वोच्च संस्थांनी एकसमान मार्गदर्शक सुचना निर्गमित कराव्यात, त्यासाठी आपण त्यांना निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती.

अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडर संदर्भात युजीसीने लागू केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे राज्य तंतोतंत पालन करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच अंतिम वर्षाच्या परिक्षा यापूर्वी जुलै २०२० मध्ये घेण्याचं ठरवण्यात आलं होतं. परंतू कोविड-१९ ची राज्यातील सध्याची परिस्थिती विचारात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या १८ जून २०२० च्या बैठकीत व्यावसायिक तसेच अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ ठरवतील त्या फॉर्म्यूल्यानुसार त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यावरही जे विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी जेव्हा परिक्षा घेता येतील तेव्हा त्या घेण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे राज्य शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना निर्देश देऊन त्यास मान्यता देण्याचे निर्देश द्यावेत आणि तशा एकसमान सुचना विद्यापीठांसाठी निर्गमित कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे या पत्रान्वये केली आहे.


हेही वाचा – चीनने घुसखोरी केली नाही असं का म्हटलं?; पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्राला सवाल


दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एमडी, एमएस, डीएम आणि एमसीएच परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला द्यावेत, अशी विनंती केली आहे. तसंच ही परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत तहकूब करण्याची विनंतीही राज्य शासनाने मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाला केली आहे. सध्या राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तसंच सर्व सरकारी डॉक्टरही रुग्णांच्या सेवेत दिवसरात्र झटत आहेत. या सर्व परिस्थितीत, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एमडी/एमएसच्या परीक्षांचं ३० जुलैपूर्वी आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -