पुणे-सातारा महामार्गावर कारचा भीषण अपघात

पुणे-सातारा महामार्गावरील वारेज उड्डाणपुलाजवळ कारचा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत कार चालक सुदैवाने बचावला. मात्र, कारचा चक्काचूर झाला.

Pune
car accident on pune-satara highway
पुणे-सातारा महामार्गावर कारचा भीषण अपघात

पुणे-सातारा महामार्गावर कारचा आज सकाळी भीषण अपघात झाला. ही दुर्घटना पुणे सातारा महामार्गावरील वारेज उड्डाणपुलाजवळ घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने गाडीत असलेल्या एअरबॅगमुळे चालकाचा जीव बचावला. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. एका टँकरने कारला धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे मोठी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. मात्र, गर्दीपैकी एकही व्यक्ती चालकाला गाडीतून बाहेर काढण्यासाठी पुढे धजावली नाही. दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचालकाला कारमधून बाहेर काढले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कारला बाजूला केले आणि वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

हेही वाचा – ‘सेल्फी विथ खड्डा’; मनसेचा नवा उपक्रम

काय आहे नेमके प्रकरण?

चांदणी चौकाकडून कात्रजच्या दिशेला जाताना हा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर पॉप्युलर पूल ओलांडल्यानंतर हा अपघात घडला. कारच्या पुढे असणाऱ्या टँकरने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे कार चालकाने प्रसंगावधान राखत कार नियंत्रणात आणली. परंतु, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका कंटेनरने कारला धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की कार पुढच्या टँकरला जाऊन जोरात धडकली. या दुर्घटनेत कारचा चक्काचुर झाला. कारची अवस्था पाहून कार चालकाचा जीव वाचेल, याबाबत प्रत्यक्षदर्शींना साशंकता वाटत होती. मात्र, गाडीत असणाऱ्या एअरबॅगमुळे चालकाचा जीव बचावला. या दुर्घटनेनंतर टँकर आणि कंटेनर या दोन्ही वाहनाच्या चालकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि दुर्घटनेबद्दल माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कारमधील चालकाला बाहेर काढले. त्यानंतर जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.