Railway : पंचवटी एक्स्प्रेसमधून कोरोना होणार हद्दपार

मध्य रेल्वेने हॅण्ड्स फ्री सुविधा रेल्वे डब्यांमध्ये उपल्बध करून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 174 दिवसांनंतर मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस धावली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात नाशिककरांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने मध्य रेल्वेने हॅण्ड्स फ्री सुविधा रेल्वे डब्यांमध्ये उपल्बध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस प्रवास सुरक्षित होणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी हॅण्ड्स फ्री सुविधा

कोरोनापासून बचाव करण्यासाठी, कोरोना काळात रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने भारतीय रेल्वेने शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आता टाळेबंदी काही अंशी शिथिल करण्यात आल्यावर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्रात आंतर जिल्हा रेल्वे प्रवासाला मान्यता मिळताच रेल्वेने मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसही सुरू केली आहे. त्यामुळे ही ट्रेन सुरू झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, नाशिककरांचा रेल्वे प्रवास कोरोना काळात सुरक्षित व्हावा या उद्देशाने मध्य रेल्वेने हॅण्ड्स फ्री सुविधा रेल्वे डब्यांमध्ये उपल्बध करून देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून प्रवासात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. सध्या मध्य रेल्वेने मनमाड- नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसच्या तीन वातानुकूलीत डब्यांमध्ये हॅण्ड्स फ्री सुविधा दिली आहे. ज्यामुळे रेल्वे डब्यातील शौचालयाचे पाण्याचे नळ, दरवाजाचे हँडल यांना स्पर्श करण्याची गरज प्रवाशांना भासणार नाही. कारण शौचालयात आणि बाहेर असणार्‍या वॉश बेसिनसाठीही फूट प्रेसची सुविधा उपल्बध करून देण्यात आली आहे. पायाद्वारे पाण्याचा नळ किंवा साबणाचा वापर करता येणार आहे.

नवीन डब्यात असणार सुविधा

भारतीय रेल्वेकडून कोरोना काळात प्रवासी सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वेच्या नवीन डब्यात अनेक बदल करण्यात येत आहेत. नव्या बदलांनुसार, डब्यांमध्ये अनेक हॅण्ड्स फ्री सुविधा असणार आहेत. पाण्याचे नळ, दरवाजाचे हँडल यांना स्पर्श करण्याची गरज भासणार नाही. तसेच रेल्वे डब्यातील हँडल, दरवाजाचे हँडल, लॅच इत्यादींवर तांब्याचं- कॉपर कोटिंग करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव कॉपर कोटिंगवर लवकर संपुष्टात येतो.

कोरोना काळात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड-नाशिक-मुंबई विशेष गाडीच्या तीन डब्यांत हॅण्ड्स फ्री सुविधा प्रवाशांना उपल्बध करून देण्यात आली आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे,