केंद्रीय पथकाकडून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून आज पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात आली. या पाहाणी दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे.

Pune
central squad survey drought conditions in pune district
केंद्रीय पथकाकडून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आज फलटणमार्गे जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्‍या माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पथकाने कुंभारवन, पिंपरी, चाचर मावडी (सुपे) या भागातील शिवाराची पहाणी केली. पिण्याच्या पाण्‍याचे टँकर, जनावरांना चारा – पाणी या संदर्भात जिल्‍हा प्रशासन तात्काळ कार्यवाही करेल, असेही पथकानी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतली परिस्थिती

जिल्हा प्रशासनाच्यावतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती, पाण्याचा साठा, टंचाईमुळे उद्भवणारी परिस्थिती याशिवाय पशुधन आणि चाऱ्याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल केंद्रीय पथकाला सादर करण्यात आला. कुंभारवन, पिंपरी, चाचर मावडी (सुपे) या परिसरातील स्थानिक पदाधिकारी, शेतकरी, महिला यांनी पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी देखील मागणी केली गेली. या पथकात पशुधन आणि दुग्धविकास विभागाचे एम.जी. टेंभुर्णे आणि विजय ठाकरे यांचा देखील समावेश होता. राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह हेही या पथकासोबत होते. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रारंभी पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरणातील पाणी परिस्थितीची माहिती दिली. त्‍यानंतर एम.जी. टेंभुर्णे आणि विजय ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्‍या व्‍यथा जाणून घेतल्‍या. तसेच जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी शेतकऱ्यांची संवाद साधत शेतकऱ्यांना दिलासा दिला.